MaharashtraNewsUpdate : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आश्वासित करून मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला “हा” सल्ला

‘राज्यावरील कोरोनाचं संकट संपत नाही तेच अतिवृष्टीचं संकट आलं आहे. सोलापूर, मराठवाड्यात मोठं नुकसान झाले आहे. काही दिवसांमध्ये आणखी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे घाईगडबडीने कोणताही निर्णय घेतला जाणार नाही’, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूरमधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ‘आजच्या या दौऱ्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली, त्याआधीही प्रशासनाच्या संपर्कात होतो. अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही आपत्ती मोठी आहे, नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मी इथं आलो आहे. जे जे काही शक्य असेल ती सर्व मदत केली जाईल’, असं आश्वासनही उद्धव ठाकरेंनी दिले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्यात जाऊन पूरग्रस्त भागांची पाहणी केली. दरम्यान उद्या आणि परवाही मी पूरग्रस्त भागात फिरणार आहे, असे त्यांनी पुढे सांगितले. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी सरकार तुमचंच आहे आणि सदैव तुमच्यासोबत आहे, असा विश्वास शेतकऱ्यांना दिला. प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे धनादेशही त्यांनी सुपूर्द केले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अतिवृष्टीच्या संवेदनशील विषयातही राजकारण करणाऱ्या विरोधी पक्षांचा समाचार घेतला व केंद्राकडून भरीव मदत मिळण्यासाठी सर्वांनी एकत्रपणे प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन केले.
देवेंद्र फडणवीस यांना दिला हा सल्ला
राज्यावर परतीच्या पावसामुळे ओढवलेल्या पूरसंकटात बळीराजा कोलमडून पडलेला असताना शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधक सातत्याने राज्य सरकारला लक्ष्य करत असताना सोलापूर येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपने बिहार विधानसभा निवडणुकीची धुरा दिली आहे. बिहारचे प्रभारी म्हणून ते काम पाहत आहेत. ‘बिहारमध्ये निवडणुकीचा प्रचार करण्यापेक्षा स्वत:च्या राज्यासाठी आधी काम करा’, असा खोचक सल्लाच मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना दिला.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार पूरग्रस्त जनतेसाठी काय करेल याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही ज्या राज्याचे आहात त्यासाठी आधी काम करा. बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा आपल्या राज्यात लक्ष घाला. तुम्ही राज्याचे विरोधी पक्षनेते आहात आणि महाराष्ट्रातील एक जबाबदार नेते आहात, याचे भान राहू द्या, असा टोलाच मुख्यमंत्र्यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस सध्या नियमितपणे बिहारला जात आहेत. तसं त्यांनी थोडं दिल्लीतही जावं. ते दिल्लीत गेले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील घराबाहेर पडतील, असा खोचक सल्लाही मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना दिला.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुक्रवारी मला फोन आला होता. पूरस्थितीबाबत माहिती घेताना त्यांनी आवश्यक ती मदत करू, असे सांगितले आहे. त्यामुळे केंद्राकडे मदत मागण्यात काही गैर नाही’, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुढे नमूद केले. केवळ काहीतरी घोषणा करायची म्हणून करणार नाही. जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या कुटुंबाना अर्थसहाय्य करणे आम्ही सुरू केले आहे. पंचनामे सुरू झाले असून ते पूर्ण झाल्यावर संपूर्ण माहिती येताच प्रत्यक्ष मदत केली जाईल. जे जे काही करता येणे शक्य व आवश्यक आहे ते सगळं केल्याशिवाय राहणार नाही, असं ठाम आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलं.