Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : महाराष्ट्रात अनलॉक-4 करण्याची घाई करणार नाही , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती

Spread the love

देशात जूनपासून मिशन बिगेन सुरु करण्यात आले असले तरी महाराष्ट्रात अनलॉक-4 करण्याची घाई करणार नाही असे स्पष्ट मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. आधी सर्व सुरु करायचे आणि नंतर बंद करण्याची वेळ येऊ नये, त्यामुळे खात्री झाल्याशिवाय अनलॉकचा निर्णय घेतला जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना नियंत्रणात  येतोय ही चांगली बाब असली तरी कौतुकाचे बळी पडू नका, कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, हा जगाचा अनुभव असल्याने गाफीलही राहू नका असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. दरम्यान केंद्र सरकारने अनलॉक-4 ची प्रक्रिया सुरु केली असून गृहमंत्रालय लवकरच नव्या गाईडलाईन्स जारी करणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोनाच्या परिस्थितीचा  आढावा सोमवारी ठाणे पालिका मुख्यालयाच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात घेतला. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि तीनही महापालिकांचे आयुक्त आणि सर्व अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, देशात कोरोना संदर्भात जी लढाई सुरु आहे त्यात महाराष्ट्र कुठेही मागे नाही. एमएमआर रिजनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही वाढतच होती,  मात्र गेल्या महिनाभरात डॉक्टर्स, नर्स, पोलीस,  शासकीय आणि पालिका यंत्रणांनी चांगल्या पद्धतीने मुकाबला केला असून या सर्व यंत्रणांचा अभिमान असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. इतर राज्यात किंवा जगभरात लॉकडाऊन ओपन करण्याची घाईगडबड केली आहे. परंतु तशी घाई महाराष्ट्र अजिबात करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. एखादी गोष्ट सुरु करायची असेल तर त्याची पूर्ण खातरजमा केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी ठाणे, कल्याण, नवीमुंबई येथील महापालिकांना महत्वाच्या सूचना दिल्या. त्यानुसार कोरोना रोखण्यात जरी कौतुकाची थाप मिळत असेल तरी गाफील न राहता आपल्याला हा आकडा शून्यापर्यंत  आणायचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कल्याण डोंबिवलीत जरी कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असली तरी आता ती रोखण्यासाठी काही महत्वाच्या उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार त्यानुसार पुढील 20 ते 25  दिवसांत यात नक्कीच बदल दिसून येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान खाजगी रुग्णालयात आजही जर लुट होत असेल तर तक्रार करा, त्या तक्रारीची नक्कीच दखल घेतली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते म्हाडाने तयार केलेल्या कळवा आणि मुंब्य्रात 1100 बेडचे कोविड केअर सेंटरचे ई लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे कळवा आणि मुंब्य्रासह आजूबाजूच्या परिसरातील नागरीकांना या रुग्णालयाचा फायदा होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आता रुग्णांना बेड मिळणार नाही, अशी तक्रार देखील येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सेवेत दाखल झालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!