अभिव्यक्ती : डॉ. नागनाथ कोडे: उत्तम पोलीस प्रशासक, ३० वर्षांच्या निष्कलंक सेवेचा गौरव … !!!

Spread the love

डॉ. नागनाथ कोडे  सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा औरंगाबाद शहर येथे तीस वर्षाची निष्कलंक सेवा करून 31 जुलै 2020 ला सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. 1987 साली  एम. एससी. कृषीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉ. नागनाथ कोडे यांची  महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली आणि ते नाशिकला महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये  प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाले आणि त्यांचा पोलिस सेवेचा प्रवास सुरू झाला. यशस्वी प्रशिक्षणानंतर ते सन्मानाने उस्मानाबाद येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर रुजू झाले. पुढे नांदेड, बीड,  जालना , पुन्हा नांदेड आणि आता औरंगाबाद येथे वेगवेगळ्या शाखांमध्ये  त्यांनी पोलीस खात्याची सेवा केली. त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा  डॉ. खुशालचंद बाहेती यांनी घेतलेला संक्षिप्त आढावा.


लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील धवेली  या गावात एका सधन शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला मात्र 1972च्या दुष्काळाची फार मोठी झळ त्यांच्या कुटुंबाला बसली परिणामी दुष्काळामध्ये फार कठीण प्रसंगाला त्यांना  तोंड द्यावे लागले परंतु परिस्थितीपुढे हार न मानता जिद्दीने कोडे कुटुंबियांनी,  वडिलांनी, व ज्येष्ठ बंधूंनी कुटुंबाला  पूर्व पदावर आणले डॉक्टर साहेबांचे वडील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते होते.  गावातून राजकीय व सामाजिक सुरुवात करून त्यांनी तालुका व जिल्हास्तरावर मजबूत पकड व छाप पाडली होती . ते स्वतः ३० वर्षे सोसायटीचे चेअरमन होते . पुढे त्यांचे ज्येष्ठ बंधूनी  बरेच वर्ष सरपंच व सोसायटीचे चेअरमन म्हणून गावाची व जनतेची सेवा केली.
मुळातच घरातूनच  बाळकडू मिळाल्याने त्यांना समाजकारण,  राजकारण,  साहित्य, खेळ,  शैक्षणिक उपक्रम,  संस्कृतिक कार्यक्रम,  वक्तृत्व इत्यादी कामाची आवड होती व त्यात  त्यांनी वैपुण्यही  मिळवले होते.  हा त्यांचा गुण पुढे पोलिस सेवेतही कायम राहिला , त्या सर्व गुणांचा कोडे यांच्या व्यक्तिमत्त्वातून विकासच होत गेला.  पोलीस विभागातही त्यांनी कायद्याचा सखोल अभ्यास केला. एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत गेल्याशिवाय डॉक्टरांना चैनच पडत नाही यामुळेच गुन्हे तपासातील त्यांचे नैपूण्य  तर वाखाणण्यासारखे आहे त्यांच्या पूर्ण सेवेमध्ये आजपर्यंत NDPS कायद्यातील एकही प्रकरण कोर्टात मधून सुटलेले नाही त्यांचीही कीर्ती व कौशल्य विभागात महाराष्ट्रभर पसरली होती त्यामुळे गुन्हे तपासाच्या संदर्भांमध्ये DGP ऑफिस , पोलीस अकॅडमी नाशिक अशा वेगवेगळ्या ठिकाणी मार्गदर्शनासाठी त्यांना व्याख्याते म्हणून बोलावत असत.  याच त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल 01 मे 2017 रोजी मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी सन्मानचिन्ह देऊन  त्यांना सन्मानित केलेले आहे.

पोलीस खात्यात सर्व शाखेत काम करण्याचा त्यांचा दांडगा अनुभव आहे.  कोणत्याही शाखेत बदलून गेले तरी तेथे डॉक्टर स्वतःच्या कर्तृत्वाची छाप पाडतात म्हणून ते त्यांच्या कायदेविषयक ज्ञानामुळे हजर जबाबामुळे एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून वरिष्ठांच्या कसोटीला उतरलेले आहेत . याचाच परिणाम म्हणून खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रश्न सोडवणाऱ्या वृंद परिषदेवर त्यांची सन्मानाने निवड झाली होती व त्यांच्या माध्यमातून बरेच प्रलंबित प्रश्न मार्गी लागले होते. पोलिस विभागात कायदेशीर कामे करताना डॉक्टरांनी कधीच तत्वाशी तडजोड केली नाही.

” जे खळांची व्यंकटी सांडो |  तया सत्कर्मी रती वाढो |

भूता परस्परे जडो |  मैत्र जीवांचे | | “

या भूमिकेशी प्रामाणिक राहून ” सदरक्षणाय खलनिग्रहणाय..”  हे ब्रीदवाक्य संपूर्ण काळात त्यांनी प्रयत्न केला त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.त्यांच्या या सर्व कार्याचा गौरव म्हणून म्हणून 15 ऑगस्ट 2017 ला भारताचे महामहीम राष्ट्रपती यांच्या शुभहस्ते पोलीस पदक देऊन डॉक्टर साहेबांचा सर्वोच्च सन्मान झाला , हे त्यांच्या कर्तव्य निष्ठेला व सेवेला मिळालेले गोड फळ असे म्हणावे लागेल. पोलीस खात्यातील खडतर सेवा करताना देखील डॉक्टरांनी त्यांचे वाचन लेखन व शिक्षण या कधीच खंड पडू दिला नाही.  महाविद्यालय जीवनामध्ये हृदयात घर करून बसलेले ” प्रेमाचे फुल एकच मूल ” या  तीन अंकी नाटकाचे बरेच प्रयोग झाले . त्यांनी शिक्षणाच्या जिद्दीपोटी स्वामी रामानंद विद्यापीठात ” क्रिटीकल स्टडी ऑफ क्रिमिनल अँड  पॉवर ऑफ पोलीस इन इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू नांदेड रेंज “  या विषयावरील अभ्यासपूर्ण प्रबंध सादर केला आणि विद्यापीठाने त्यांना सन्मानाने डॉक्टरेट ही पदवी बहाल केली आणि नागनाथ कोडे पुढे डॉक्टर नागनाथ कोडे झाले.  दरम्यानच्या काळात त्यांनी एल.एल. बी. , एल. एल. एम. आणि ” ह्यूमन रिसोर्सेस ” मध्ये एमबीएची पदवी मिळवली.  असा सर्व उच्च पदव्या घेतलेला अधिकारी पोलिस विभागात क्वचितच सापडेल.
लेखनाचा छंद त्यांनी कायमच जोपासला . त्यांनी कायद्याची पुस्तके लिहिली. खात्या अंतर्गत पीएसआय मुख्य परीक्षेसाठी फौजदारी कायदे हे अभ्यासपूर्ण  पुस्तक लिहीले एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ऑल कॉम्पिटेटिव्ह लॉज , संपूर्ण फौजदारी कायदे हे पुस्तक लिहिले ते तरुण पिढीसाठी मोलाचे मार्गदर्शन ठरत आहे.

डॉक्टर नागनाथ कोडे यांच्या या सुखी व समाधानी जीवनाचे श्रेय त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. राजश्री यांना देतात.  खात्यातील या धकाधकीच्या आणि सर्व दुःख सुखाच्या प्रसंगात त्या डॉक्टरांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि सावलीसारखी सोबत घेऊन मुलांवरही चांगले संस्कार केले . कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी सांभाळली डॉक्टरांची दोन्ही मुले चिरंजीव अनिकेत व चिरंजीव अक्षय आज एमबीबीएस डॉक्टर आहेत याचे डॉक्टरांना खूप समाधान आहे पोलीस विभागात रात्रंदिवस सेवा करत असतानाही त्यांनी गावाकडची नाती कधी तुटू दिली नाही त्यांनी गावाकडे बंधूंच्या सहकार्याने द्राक्ष,  केळी , सीताफळ, पपई,  पेरू,  टोमॅटोची आधुनिक शेती केली आणि पंचक्रोशी मध्ये एक प्रगतिशील शेतकरी प्रगतिशील शेतकरी म्हणून ही ओळख निर्माण केली आहे.

डॉक्टर नागनाथ कोडे आयुष्याकडे नेहमीच सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात. संकटे येतात जातात आपण पुढे पुढे चालत राहावे हे त्यांचे मत आहे. त्यांनी जीवनात जीविका व उपजीविका यात नेहमीच फरक केलेला आहे स्वतःला आनंद मिळवण्यापेक्षा इतरांना आनंद देण्यात धन्यता मानतात , यातूनच त्यांनी आयुष्यभर नवीनच मित्रपरिवार सामाजिक,  साहित्यिक,  सांस्कृतिक,  प्रशासकीय , प्रसारमाध्यमातील पत्रकार सर्वांशीच त्यांचे जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध राहिलेले आहेत. डॉक्टरांनी आयुष्याच्या संपूर्ण प्रवासामध्ये माणसे जोडण्याचे काम केले आहे . रक्ताच्या नात्या बरोबरच माणुसकीच्या नात्यावर त्यांचा प्रचंड विश्वास आहे.  डॉक्टर नागनाथ कोडे समाधानी जीवन जगत असताना, महात्मा बसवेश्वर यांच्या ” काय कवे कैलास”  या तत्वज्ञानाच्या खूप जवळ जातात . कष्ट करत राहा . फळ आपोआप मिळेल आणि मेहनतीचे मिळवलेल्या भाकरीतच  परमेश्वर व स्वर्ग दडलेला  आहे.  यावरच त्यांची निष्ठा आहे.  डॉक्टर नागनाथ कोडे त्यांना वरिष्ठांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शन व प्रेमाने आणि आपुलकीने केलेल्या सहकार्याबद्दल कायमचे ऋणी राहू इच्छितात . सोबतच व कार्यालयातील सर्व सहकाऱ्यांनी  जे  बहुमोल सहकार्य केले , प्रेम केले , जिव्हाळा दिला,  त्यांच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी डॉक्टर माझ्याजवळ शब्द नाहीत असे म्हणतात . साहेबांचे गुरु डॉ. रे . भा . भारस्वाडकर यांच्या शब्दात  सांगायचे झाल्यास ते म्हणतात,

सगळेच बंध आता तोडून  चाललो मी, 

सगळे ऋण  आता घेऊन चाललो मी…

डॉक्टर नागनाथ कोडे आज या सेवेतून निवृत्त होत असले तरी हा फक्त स्वल्पविराम आहे , पूर्णविराम मात्र नक्कीच नाही . भविष्यामध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये ते यापेक्षाही जास्त समाजाची व देशाची सेवा करतील त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन त्यांना अशीच उंच भरारी घ्यावी यासाठी त्यांना निरोगी व उदंड आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा.

डॉ.  खुशालचंद बाहेती

सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त, औरंगाबाद शहर.

आपलं सरकार

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.