Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दिल्लीतील शाहिनबाग नंतर आता नाशिकच्या “सादिक बागे”तही सुरु झाले आंदोलन

Spread the love

केंद्राने मंजुरी दिलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शाहीनबागप्रमाणे नाशिक शहरात शनिवारपासून (दि. २२) ‘सादिकबाग’ आंदोलन सुरू झाले आहे. संविधान बचाओ एकता समितीतर्फे आयोजित आंदोलनात सकाळी अकरा वाजेपासून शेकडो महिलांनी ठिय्या दिला आहे. कुराण पठणाने आंदोलनाला प्रारंभ झाला. यावेळी ‘हैं हक्क हमारा आझादी’, ‘हम लेके रहेंगे आझादी’, ‘चप्पा चप्पा गुंज उठेगा इन्कलाब के नारो से’, ‘हिंदुस्थान जिंदाबाद’, ‘तुम्हारी लाठी से तेज हमारी आवाज हैं’, ‘हम लढेंगे, हम जितेंगे’,’हम एक हैं’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘संविधान जिंदाबाद’, ‘मजहब नहीं सिखाता, आपस में बैर रखना हिन्दी हैं हम वतन हैं हिन्दोस्ता हमारा’, अशी घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करण्यात आली. पदवीधरांचे प्रमाणपत्र तपासून त्यांना नोकरी देण्यापेक्षा स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय रहिवासाचे दस्ताऐवज मागण्यात केंद्र सरकारला अधिक रुची आहे. रोजगार आणि देशातील इतर समस्यांकडे मुद्दाम दुर्लक्ष करून ‘सीएए’चा मुद्दा पुढे केला जात असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. हाती तिरंगा घेऊन महिला आंदोलनात सहभागी झाल्या. जुने नाशिकसह वडाळा गाव, सिडको, सातपूर, नाशिकरोड भागातील चिमुकल्यांसह ज्येष्ठ मुस्लिम महिलांपर्यंत शेकडो आंदोलकांचा सहभाग आहे. सायंकाळी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते. आणखी किती दिवस महिलांचा ठिय्या असेल, याबाबत निश्चित सांगण्यात आलेले नाही. पोलिसांनी आंदोलनासाठी चोख बंदोबस्त ठेवला असून, मैदानात महिला पोलिसांचे पथक तैनात आहे. तर, बाहेर वाहतूक कोंडी होऊ नये वाहतूक पोलिसांचाही वॉच ठेवण्यात आला आहे.

या आंदोलनात जुने नाशिक येथील महिलांच्या मदरशातील विद्यार्थिनीने आपले मत व्यक्त केले. आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड, पासपोर्ट हे भारतीय असल्याचे पुरावे असूनही आता नव्याने पूर्वजांचा रहिवास असल्याचे पुरावे मागणे, हे षडयंत्र आहे. यामुळे सर्वधर्म समभाव असलेल्या हिंदुस्थानातच आपण आहोत ना, हा प्रश्न पडत असल्याचे ती म्हणाली. दरम्यान ‘पीर महेबूब सुब्हानी साहब वक्फ ट्रस्ट’च्या धर्मार्थ दवाखानातर्फे ठिय्या आंदोलनासाठी मोफत वैद्यकीय सेवा ईदगाह मैदानात देण्यात येत आहे. शिवाय आंदोलनकर्त्यांसाठी जेवण, पाणी आणि नाश्त्याची सोय केली आहे. यासह महिलांना मैदानात पोहोचणे सोयीस्कर व्हावे म्हणून, विविध भागातून मोफत रिक्षा आणि बससेवा देण्यात आली. दुपारी अडीचपर्यंत महिला विविध भागांतून गटागटाने आंदोलनात सहभागी होत होत्या. यामुळे दुपारनंतर आयोजकांना मंडप वाढवावा लागला. जुने नाशिक भागातील भद्रकाली परिसरात असलेली बडी दर्गा ही हजरत पीर सय्यद सादिक शाह हुसैनीबाबा यांची दर्गा आहे. या दर्गाचा इतिहास शेकडो वर्षांपूर्वीचा असून, हुसैनीबाबा यांचा जन्म मदिना शरीफ (हज) येथे झाला. बादशहा जहाँगीर यांच्या काळात म्हणजेच सुमारे पाचशे वर्षांपूर्वी हुसैनीबाबा नाशिकमध्ये आले. त्यांच्या भूमीत आंदोलन होत असल्याने ‘सादिकबाग’ असे नाव देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!