Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेतली बातमी : आ. वारीस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल खा . असदुद्दीन ओवेसी यांनी घेतला हा मोठा निर्णय

Spread the love

कर्नाटकच्या गुलबर्ग्यातील वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आलेले ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे नेते, माजी आमदार वारिस पठाण यांना पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही  चांगलेच फटकारले आहे. पठाण यांचे ‘आम्ही १५ कोटी १०० कोटींना भारी आहोत’, हे वक्तव्य ओवेसी यांना मुळीच आवडलेले नाही. नाराज झालेल्या ओवेसी यांनी पठाणांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे आता पक्ष परवानगी देत नाही तो पर्यंत वारिस पठाण हे कोणतेही सार्वजनिक वक्तव्य करू शकणार नाहीत.

कर्नाटकातील गुलबर्गा येथे असदुद्दीन ओवेसी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सभेचे आयोजन केले होते. या सभेत बोलताना माजी आमदार वारिस पठाण यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले होते. ‘१५ कोटी आहोत मात्र १०० कोटींवर भारी आहोत हे लक्षात ठेवा’, असे वक्तव्य वारिस पठाण यांनी या सभेत केले होते. यानंतर पठाण यांच्यावर देशभरातून टीका सुरू झाली आहे. खुद्द ओवेसी यांनीही पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. ‘ईंट का जवाब पत्थर, हे आता आम्ही शिकलोय. पण यासाठी एकत्र वाटचाल करावी लागेल. स्वातंत्र्य दिलं जाणार नसेल तर ते जबरदस्तीनं मिळवावं लागेल. ते म्हणतात की आम्ही स्त्रियांना पुढे करतो… केवळ वाघिणी बाहरे पडल्यात तर तुम्हाला घाम फुटलाय. मग, आम्ही सगळे एकत्र आलो तर तुमचं काय होईल, हे समजून जा. १५ कोटी (मुस्लीम) आहोत पण १०० कोटींना (हिंदू) वरचढ आहोत, हे ध्यानात ठेवा’ असं वादग्रस्त वक्तव्य वारिस पठाण यांनी केलं होतं.

दरम्यान  पठाण यांनी हे वक्तव्य केल्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. प्रसिद्ध कवी जावेद अख्तर यांनी देखील पठाण यांना खडे बोल सुनावले आहेत. या पार्श्वभूमीवर पठाण यांना प्रश्न विचारला गेला तेव्हा, ‘जे लोक विरोध करत आहेत ते कायद्याच्या विरोधात आहेत. भाजप आम्हाला १३० कोटी लोकांपासून वेगळं करण्याच्या प्रयत्नात आहे’ असं म्हणत त्यांनी भाजपला लक्ष्य केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!