Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

डॉ . पायल तडवी प्रकरणातील आरोपींना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यास न्यायालयाचा नकार

Spread the love

मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये झालेल्या डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी नायर रुग्णालयात तूर्तास जाता येणार नाही. रुग्णालयाची भूमिका ऐकून घेतल्यानंतर हायकोर्टाच्या न्यायमूर्ती साधना जाधव यांनी त्यांना शिक्षण पूर्ण करण्यास तूर्तास परवानगी देण्यास नकार दिला आहे.

बहुचर्चित डॉ. तडवी आत्महत्या प्रकरणात डॉक्टर हेमा अहुजा, अंकिता खंडेलवाल व भक्ती मेहर या तिघी आरोपी असून, त्यांना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जामीन देताना नायर रुग्णालयात कधीही न जाण्याची अट घातली होती. त्यांना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करायचे असल्याने नायर रुग्णालयात जाऊ देण्याची परवानगी त्यांनी अर्जाद्वारे मागितली होती. या तिघींनी अॅड. आबाद पोंडा यांच्यामार्फत अर्ज केला होता. ‘आरोपींना शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही’, असं निरीक्षण न्यायमूर्ती साधना जाधव यांनी नोंदवून या तिघींना नायर रुग्णालयातच अन्य एखाद्या विभागात पोस्टिंग देऊन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करू दिले जाऊ शकते का, याची माहिती देण्यासाठी न्यायमूर्तींनी नायर रुग्णालयाच्या स्त्री रोग विभागाच्या प्रमुखांना न्यायालयात बोलावले होते.

दरम्यान ‘नायर रुग्णालयात आजही त्या घटनेने वातावरण चांगले नाही. मी काल सर्व संबंधितांची बैठक घेतली. त्यात असे समोर आले की या तिघी आरोपी डॉक्टर पुन्हा रुग्णालयात आल्या तर चांगले होणार नाही. प्रतिक्रिया उमटतील आणि त्यानंतर आरोपींना काही झाल्यास त्याची जबाबदारी रुग्णालयावर राहणार नाही,’ असे  रुग्णालयाच्या वतीने  स्पष्ट करण्यात आले . रुग्णालयाची यासंदर्भात भूमिका ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती साधना जाधव यांनी त्यांना नायर रुग्णालयात शिक्षण पूर्ण करण्यास तूर्तास परवानगी देण्यास नकार दिला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!