Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नाममात्र १० रुपये किमतीच्या शिवभोजन थाळीला प्रजासत्ताक दिनापासून प्रारंभ

Spread the love

शिवसेनेने घोषित केल्याप्रमाणे राज्यातील गरीब आणि गरजूंना फक्त १० रुपयांत जेवणाची थाळी देणाऱ्या ‘शिवभोजन’ योजनेचा शुभारंभ २६ जानेवारीपासून करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेचा आज आढावा घेऊन  अंमलबजावणीचे निर्देश दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये शिवभोजन योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर गेल्या महिन्याच्या अखेरीस मंत्रिमंडळानं या शिवभोजन योजनेला मान्यता दिली होती. ती सध्या प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार होती. त्यासाठी तीन महिन्यांत ६ कोटी ४८ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला ५० ठिकाणी शिवभोजन योजनेंतर्गत १० रुपयांत जेवणाची थाळी देण्यात येणार होती. या योजनेची आता राज्यभरात अंमलबजावणी करण्याचे निर्देश आज, शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतल्यानंतर दिले. एका उपहारगृहावर किमान ७५ आणि कमाल १५० थाळ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

या शिवभोजन योजनेंतर्गत भोजनालयात प्रत्येकी ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅम भाजी, १०० ग्रॅम भात, १०० ग्रॅम वरण असलेली थाळी अवघ्या १० रुपयांत देण्यात येणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारची शिवभोजन योजना ही अटी-शर्तींमुळे विरोधकांच्या रडारवर आली होती. शिवभोजन योजनेतील अटी बघूनच भूक मरेल. या योजनेचे नाव बदलून अटीभोजन करा, अशी टीका माजी खासदार नीलेश राणे यांनी केली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!