अभिव्यक्ती : महाराष्ट्राच्या महाभारतातील “आधुनिक कृष्ण ” आणि मोदी -शहांची ” शिकार “

Advertisements
Advertisements
Spread the love

महाराष्ट्राच्या महाभारतातील “आधुनिक कृष्ण “ आणि मोदी -शहांची ” शिकार


“महाभारताचे जे जाणकार असतील त्यांना “कृष्ण ” या पात्राची चांगली ओळख असेल . महाभारतातील युद्ध व्हावे ही  तशी केवळ ” द्रौपदी “चीच इच्छा होती.  कुंतीने पांडव ,  कृष्णासोबतच्या झालेल्या बैठकीत सांगितले कि कौरवांशी युद्ध आपल्याला परवडणारे नाही . म्हणून कृष्णाने त्यांच्याकडे जाऊन मध्यस्थी करावी. कारण दोन्हीही शत्रू  पक्षात कृष्णाचे संबंध सलोख्याचे आणि सौहार्दाचे होते . म्हणून कृष्णच त्यातून मार्ग काढू शकतो अशी कुंती आणि पांडवांची इच्छा होती . पण कृष्णाची द्रौपदीच्या हालचालीवर बारीक नजर  होती . काहीही झाले तरी आपल्या अपमानाचा बदल घ्यायचाच अशी खूणगाठ द्रौपदीने बांधली होती. आणि कृष्णची नजर त्याकडे दुर्लक्ष करेल याची सुतराम शक्यता नव्हती . त्यावर बैठकीतून जाता जाता त्याने द्रौपदीवर असा काही कटाक्ष टाकला कि , काळजी करू नको मी तुझा स्वाभिमान व्यर्थ जाऊ देणार नाही, मलाही कौरवांचा हिशेब चुकता करायचा आहे . मग जाणकार हे जाणतात कि , कौरव -पांडवांमध्ये समझौता करण्यासाठी गेलेला कृष्ण त्याच्यात सलोखा घडवून आणण्यापेक्षा युद्धाची तारीख घेऊनच परत आला . आणि पुढे जे झाले ते जाहीर आहे. पवारांनीही महाराष्ट्राच्या महाभारतात कृष्णाचीच भूमिका वठवली आहे. मोदी -शहांचा सत्तेचा रथ  महाराष्ट्रात अडवला तो या “आधुनिक कृष्णा”नेच.

Advertisements

महाभारत हा भारताचा लोकप्रिय ग्रंथ आहे त्यातील पात्रे आजही जिवंत असल्याचे  दिसतात त्यातलेच एक महत्वाचे पात्र आहेत शरद पवार. शरद पवार तसे मुरब्बी आणि अनुभवी राजकारणी आहेत. म्हणूनच त्यांना राजकारणातील “जाणता राजा” म्हणतात. त्यांच्याबरोबरचे अनेक नेते आले आणि गेले पण पवार आजही “पीच”वर टिकून आहेत . त्यांचा राजकीय मुत्सद्दीपणा लक्षात घेता “राजकारण” आणि “शरद पवार”  हे दोन शब्द त्यांच्या दृष्टीने वेगळे नाहीत तर ते परस्परांना पूरक आहेत. आजपर्यंत त्यांचा एकच निर्णय चुकला तो म्हणजे राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरून सोनिया गांधी यांना विरोध करून काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा. ज्यामुळे ते देशाचे पंतप्रधान बानू शकले नाही . तसे झाले नसते तर महाराष्ट्राचा हा नेता केंव्हाच पंतप्रधान झाला असता . पुढे त्यांनी हि चूक सुधारून सोनिया गांधी यांच्याशी जुळवून घेतले हा भाग वेगळा पण केंद्रीय राजकारणात ते मागे गेले हे खरे आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एक व्हावी आणि काँग्रेसचे नेतृत्व पवारांनी  करावे हि अनेकांची इच्छा होती आणि आहे परंतु सोनिया गांधी यांना इतिहासात केलेल्या विरोधामुळेच हे आजवर शक्य झालेले नाही. पवारांचा स्वभाव गुणधर्म असा आहे कि , त्यांना हवे ते पवार करून दाखवतात मग काहीही होवो . फक्त एकदा त्यांनी काही करायचे हे मनापासून ठरवायला हवे, हे महाराष्ट्राने अनेकदा पाहिलेले आहे आणि अनुभवलेले आहे. अतिशय तगडा जनसंपर्क आणि हाती घेतलेले कार्य सिद्धीस नेण्याची मोठी कला पवारांना अवगत आहे. त्यांच्या एवढा मोठा नेता आज तरी महाराष्ट्रात नाही. पण आपल्या एका कृतीमुळे पवार महाराष्ट्र्पुराते मर्यादित झाले पण तरीही पवार खचले नाही.

दरम्यानच्या काळात काँग्रेस -राष्ट्रवादीचे अनेक भ्रष्ट नेते , मंत्री हाताबाहेर गेल्यामुळे जनतेत मोठा रोष निर्माण झाला आणि त्याचा परिणाम म्हणून कॉंग्रेस –राष्ट्रवादीची राज्यातील सत्ता गेली आणि महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर भाजपाचाही १९९५ प्रमाणे शिरकाव झाला. शिवसेनेच्या बोटाला धरून भाजप वाढत गेला आणि त्याचा फायदा त्यांना देशभर झाला. अर्थात त्याला महाराष्ट्राचं करणीभूत आहे . भाजपला महाराष्ट्र मिळाला नसता तर भाजपचे कमळ देशात कुठेच इतक्या जोमाने फुलले नसते. पण आज त्याच शिवसेनेचे बोट सोडून भाजप महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळवूनही “हीन -दीन ” झाला आहे . अर्थात हि संधी सोडतील ते पवार कसले ?

केंद्रात आणि राज्यात २०१४ ला भाजपची सत्ता आल्यानंतर पवारांनी भाजपला आपला मैत्रीचा हात दिला , तब्ब्ल चार -साडेचार वर्षे भाजपनेही त्यांच्याशी असलेली मैत्री निभावली परंतु २०१९ च्या निवडणूक येताच भाजपने आपले रंग दाखवायला सुरुवात केली . अर्थात पवारांसारख्या खेळीयाच्या लक्षात भाजपचे हे खेळ लक्षात न आले तर नवलच !! पण पवारच्या छातीवर पाय ठेवूनच आपल्याला महाराष्ट्र काबीज करता येईल या महत्वाकांक्षेने मोदी -शहा या राजकीय जोडीने पवारांवर  ईडी चा “फास ” फेकला आणि पवारांनी तितक्याच ताकदीने हा “फास ” मोदी -शहा या जोडगोळीवर फेकला. पायाला चक्र बांधून ऊन -वारा -पावसाची तमा न करता पवार महाराष्ट्रात फिरले . प्रचाराच्या दरम्यान मोदी -शहांनी आपल्या प्रत्येक सभेत पवारांना निशाणा बनविले पण निकालानंतर पाहीले  तर पवारांनीच मोदी-शहांची अशी काही “शिकार ” केली कि आता , महाराष्ट्रात जावे कसे  ? असा प्रश्न आता मोदी -शहा या मोटाभाईंना पडला आहे. शेवटी या दोन गुजरात्यांचे राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही हेच या आधुनिक महाभारतातील  पवारांना दाखवून द्यायचे आहे आणि त्यांनी दाखविलेही. अशा रीतीने महाराष्ट्रातील एका मराठी माणसाने राजकीय व्यापार करणाऱ्या दोन गुजराती नेत्यांना “मराठी हिसका ” दाखवला आहे.

दरम्यानच्या काळात भाजपकडून युती असूनही कुठलाही मान -सन्मान मिळत नाही म्हणून त्यांच्यासोबत पाच वर्षे कसा बसा राजकीय संसार करणारी उद्धव ठाकरे यांची सेनाही दुखावली होतीच . हि “ठस ठस” लक्षात घेऊन  हे बेंड फोडण्याचा प्रयत्न पवारांनी केला नसता तर नवलच. पण यासाठी शिवसेनेची तयारी लवकर झाली नाही. काहीही झाले तरी शिवसेनेला भाजप मुख्यंमत्रीपद देणार नाही हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात यायला हवे  होते कारण प्रचार सभेतील प्रत्येक सभेत मोदी -शहा यांचे मुख्यमंत्री “देवेंद्र फडणवीस”  हेच होते . त्यामुळे दिवाळी पाडव्याला देवेंद्र फडणवीस बोलले त्यात काहीही नवीन नव्हते पण तेंव्हा तरी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे इतर पर्यायांचा तत्काळ विचार केला असता तर महाराष्ट्रात १५ दिवसांपूर्वीच ” शिवसेना -काँग्रेस -राष्ट्रवादीचे ” सरकार अस्तित्वात येऊन भाजपची आणि पर्यायाने मोदी -शाहूची “शिकार”  झाली झाली असती यात वाद नाही . पण शिवसेनेचे महत्वाचे दिवस संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत गेले ज्यातून काहीही साध्य तर झालेच नाही पण महाराष्ट्रावर भाजपच्या इच्छेप्रमाणे राष्ट्रपती राजवट मात्र आली.

तात्पर्य असे आहे कि या सर्व घटना , घडामोडीला केवळ आणि केवळ शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची लवकर निर्णय न घेण्याची कृती जबाबदार आहे . केवळ भाजपला पर्यायांची भीती दाखवत धन्यता मानण्यापेक्षा शिवसेनेने किमान शरद पवार यांच्याकडे जरी पाठिंब्याचा प्रस्ताव दिला असता तर पवारांनी सोनियांच्या पहिल्याच भेटीत काहीही करून शिवसेनेसाठी पाठिंबा आणला असता पण सोनिया गांधी यांच्याकडे आग्रहाने आणि हक्काने पाठिंबा आणावा असे त्यांच्या हातात काहीही नव्हते कारण ते पवारांना ओळखत होते पण सेनेला ओळखत नव्हते. त्यामुळे न मागता पवारांनी आणि काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याइतकी ओळख काँग्रेस नेतृत्वाकडे उद्धव ठाकरेंची तरी नाही . खरे तर ती झालीही असती कारण त्याला बाळासाहेब ठाकरे यांची पार्श्वभूमी होती . त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला मदत केली होती आणि सर्वात महत्वाची ओळख म्हणजे आणीबाणीच्या काळात बाळासाहेब ठाकरे हे इंदिरा गांधी यांचे खंदे समर्थक होते . पण हि ओळख दाखविण्यास उद्धव ठाकरे असमर्थ ठरले. त्यामुळे भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला पाठिंबा द्यायचा कसा ? असा प्रश्न काँग्रेस नेतृत्वासमोर उभा राहणे साहजिक आहे . या सर्व तहाच्या आणि नव्या दोस्तीच्या राजकारणात शिवसेनेने खुल्या दिलाने  पवारांना काही अधिकार देण्याची गरज आहे . असे झाले नाही तर सेनेला काहीही साध्य करता येणार नाही.

अर्थात आता सत्तेच्या समीकरणाच्या सर्व चाव्या शरद पवारांच्या हातात आहेत . म्हटले तर ते घडवू शकतात आणि म्हटले तर ते बिघडवू शकतात . भाजपला उखडून फेकायचे असेल तर सत्तेची पहिली गरज शिवसेनेला आहे त्यामुळे स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून त्यांनी पवारांच्या अनुभवाचा फायदा घेऊन सत्ता स्थापनेचे सार्वधिकार शरद पवार यांनाच द्यायला हवेत आणि आणि येणाऱ्या काळासाठी नवी रणनीती आखण्याची गरज आहे. सोनिया गांधी आणि त्यांच्या काँग्रेसला अशा सत्तेची गरज नाही . त्यामुळे ते शिवसेनेच्या मागे येतील या भ्रमात उद्धव ठाकरे यांनी राहता कामा नये. शिवसेनेला हा खेळ जर जिंकण्याची इच्छा असेल तर  शरद पवार यांनाच ” कृष्णा” ची  भूमिका  द्यावी लागेल तरच सेनेचा जय आहे अन्यथा त्यांना “काँग्रेस” सारखा “मित्र” मिळणे अवघड आहे. त्यातूनच सेनेला हवी असणारी ” शिकार ” होईल अन्यथा नाही.

प्रा. बाबा गाडे , ज्येष्ठ पत्रकार औरंगाबाद | email : babagade00@gmail.com

आपलं सरकार