Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : बनावट साक्षीदाराचा न्यायालयासमोर जाबजवाब , कागदपत्रांच्या तपासणीनंतर पितळ उघडे 

Spread the love

जाणता राजा मल्टिपर्पज चॅरिटेबल ट्रस्टने आदिवासींच्या विकासासाठी राबविण्यात येणा-या कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचित जमातीचे बनावट लाभार्थी दाखवून सरकारला १५ लाखांचा चुना लावला होता. याप्रकरणाचा तपास सुरू असताना बनावट कागदपत्राआधारे घरमालक असल्याचे सांगून दुस-याच साक्षीदाराने न्यायालयासमोर जवाब नोंदविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यावरुन संस्थेचा माजी सदस्य व सचिव अ‍ॅड. रमेश जाधव याच्यासह इतरांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयाचे सहायक प्रकल्प अधिकारी दिलीप नारायण खोकले यांनी आदिवासींच्या विकासासाठी कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना हॉटेल व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यासाठी २०१३ व २०१४ मध्ये कौशल्य विकास कार्यक्रम राबविला होता. त्याचे प्रशिक्षण देण्यासाठी पैठण रोडवरील नाथपुरम् येथील ‘जाणता राजा मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेची निवड करण्यात आली होती. या योजनेसाठी १५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता. यात जाणता राजाने बोगस प्रशिक्षण राबवून तसेच खोटी कागदपत्रे दाखवून रकमेचा अपहार केला. संस्थेने शासनाची फसवणूक केल्याचे समोर आल्यावरुन सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात सुनील बारसे याच्यासह प्रभारी आदिवासी विकास निरीक्षक रामराव केरबा घोगरे व जाणता राजा मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्टचा अध्यक्ष अंगद साहेबराव जाधव यांना अटक करण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी संस्थेचा राजीनामा दिलेले अ‍ॅड. रमेश जाधव यांच्याकडे माहिती विचारली होती. तेव्हा त्यांनी या प्रकरणात आणखी साक्षीदार असल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यावरुन साक्षीदार कौतिक काकाराव इंगळे (५३, रा. भोकरदन, जि. जालना) व इतर तीन साक्षीदार अ‍ॅड. जाधव यांच्याकडे हजर केले. तसेच या प्रकरणातील विद्यार्थी, हॉटेल मालक व घरमालक आहेत. यावेळी त्यांच्या आधारकार्डची तपासणी करण्यात आली. त्यात कौतिक इंगळे यांच्या आधारकार्डची प्रत अस्पष्ट होती. त्यामुळे त्यांच्याकडे आणखी कागदपत्रांची मागणी करण्यात आली. त्यांनी जाणता राजा संस्थेचा अध्यक्ष व आपल्यात भाडे करारनामा झाल्याचे सांगत त्याच्या प्रती पोलिसांना सादर केल्या. यावेळी करारनाम्यावरील स्वाक्षरींमध्ये साम्य आढळल्याने २५ फेब्रुवारी २०१९ रोजी कौतिक इंगळेला नोटीस बजावून ६ मार्च २०१९ रोजी त्यांचा न्यायालयासमोर जवाब नोंदविण्यात आला.
…..
आणि पितळ उघडे पडले….
याप्रकरणाचा तपास सुरू असतानाच सिडकोतून उपनिरीक्षक छोटुराम ठुबे यांची पोलिस आयुक्तालयाच्या दहशतवादी सेलमध्ये बदली झाली. त्यामुळे ११ मार्च २०१९ रोजी याप्रकरणाचा तपास उपनिरीक्षक प्रविण पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यावेळी त्यांना कौतिक  इंगळे याच्या घराचा पत्ता पडताळण्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे उपनिरीक्षक पाटील हे कौतिक इंगळे यांच्या घराच्या तपासणीसाठी गेले. तेव्हा कौतिक इंगळे घरीच होते. पोलिसांनी त्यांच्याकडे प्रकरणाबाबत चौकशी केली. तेव्हा त्यांनी आपल्याला या प्रकरणाबाबत कोणतीही माहिती नाही. तसेच आपण न्यायालयासमोर कोणताही जवाब नोंदविला नसल्याचे सांगितले. त्यावरुन त्यांच्या नावाचे बनावट आधारकार्ड व भाडेकरारनामा तयार करुन दुस-यानेच न्यायालयासमोर साक्ष दिल्याचे उघड झाले. त्यावरुन अ‍ॅड. रमेश जाधव व इतरांविरुध्द उपनिरीक्षक ठुबे यांच्या तक्रारीवरुन गुरुवारी सिडको पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक प्रविण पाटील करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!