Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद , सुशीलकुमार शिंदे यांची विरोधी पक्षात बसण्याची भूमिका

Spread the love

महाराष्ट्रातील भाजप-शिवसेनेतील सत्ता संघर्षात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राजकीय वैर बाजूला सारून शिवसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका काँग्रेसच्या काही नेत्यांनी घेतली असली तरी  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र काँग्रेसने शिवसेनेसोबत जाऊ नये, अशी भूमिका जाहीर केली आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस नेत्यांचे मतभेद आहेत येच यावरून स्पष्ट होत आहे.

महाराष्ट्राच्या  विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून कौल मिळाला आहे. मात्र, भाजपला सरकार स्थापन करण्यात अपयश आले  तर त्यानंतरचा दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्तास्थापनेची संधी असेल. त्यांनी सरकार स्थापण्यासाठी पुढाकार घेतला व पाठिंब्यासाठी आमच्याकडे प्रस्ताव दिला तर निश्चितच त्याचा विचार करण्यात येईल. हा प्रस्ताव हायकमांडपुढे मांडून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले होते .  त्यानंतर काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्यावर सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देऊ नये. राज्यातील जनतेनं दिलेला कौल मान्य करून विरोधी पक्षात बसावे  अशी आपली भूमिका असल्याचे शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.  काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष वेगवेगळ्या विचारधारेचे आहेत, असेही  ते म्हणाले.

या संदर्भात काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली होती. शिवसेनेसोबत सरकार स्थापण्याचा प्रश्नच येत नाही. जनतेनं काँग्रेसला जो कौल दिला आहे, त्यानुसार काँग्रेस विरोधी बाकावरच बसणार आहे, असे  त्यांनी स्पष्ट केले  होते . दरम्यान, काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची काल, गुरुवारी बैठक झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते. बाळासाहेब थोरात यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली होती. काँग्रेसचं सध्याच्या राजकीय परिस्थितीवर लक्ष आहे. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपनं देवेंद्र फडणवीस यांची पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. त्यांनी सरकार स्थापन करावं. जनतेनं काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्यासाठी कौल दिला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही, असंही त्यांनी सांगितलं होतं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!