Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राजस्थान : बसप कार्यकर्त्यांनीच नेत्यांची काढली गाढवावर धिंड , मायावतींनी व्यक्त केला संताप

Spread the love

बहुजन समाज पक्षाचे (बसपा) राष्ट्रीय समन्वयक आणि उपाध्यक्ष रामजी गौतम आणि पक्षाचे राजस्थान प्रभारी सीताराम मेघवाल यांची बसपाच्या कार्यकर्त्यांनीच गाढवावरून धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार आज जयपूरमध्ये घडला. रामजी गौतम सोमवारी लखनऊमधून जयपूरला आले होते. प्रभारी सीताराम मेघवाल यांच्यासह ते पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची आज बैठक घेणार होते. या बैठकीत संघटनेची पुनर्बांधणी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर चर्चा करण्यात येणार होती. मात्र आज बैठक सुरू होण्याआधीच बसपाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला.

दोन गाढवं आणि हातात ग्रीस घेऊन कार्यकर्ते बनीपार्क येथील बसपा कार्यालयाजवळ पोहचले. कार्यकर्त्यांनी कार्यालयात शिरून गौतम आणि मेघवाल यांना पकडले आणि खेचतच रस्त्यावर आणले. दोघांच्याही तोंडाला ग्रीस फासण्यात आले. तसेच चपलाच्या माळा गळ्यात घालून जबरदस्ती गाढवांवर बसवण्यात आले. दोघे खाली उतरले असता कार्यकर्त्यांनी अक्षरश: त्यांना उचलून पुन्हा गाढवावर बसवले. दोन्ही नेत्यांना गाढवावर बसवून फिरवण्यात आले. यादरम्यान रामजी गौतम हे मध्येच रस्त्यावरही पडले. काही कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांना धक्काबुक्कीही केली. बराच वेळ हे नाट्य सुरू होते. कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी गौतम यांनी स्वत:वर गोळी झाडून घेण्याचा इशारा दिला. मात्र, कार्यकर्ते काही शांत झाले नाहीत. दरम्यान, काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि कार्यकर्त्यांनी तिथून पोबारा केला.

मायावती यांनी या घटनेनंतर ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसवर जोरदार शब्दांत निशाणा साधला आहे. काँग्रेसने आधी राजस्थानात बसपाचे आमदार फोडले आणि आता राज्यातून आंबेडकरवादी चळवळ संपवण्यासाठी बसपाच्या वरिष्ठ नेत्यांवर हल्ले केले जात आहेत. राजस्थानात जे घडले ते अत्यंत निषेधार्ह आहे. काँग्रेसने घडवून आणलेल्या या कृत्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा मायावती यांनी दिला.

दरम्यान, गेल्या महिन्यात राजस्थानातील भाजपचे सहा आमदार मायावतींची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेले होते. त्यात राजेंद्र गुढा, जोगेंद्र सिंह अवाना, वाजिब अली, संदीप यादव, दीपचंद्र खेरिया आणि लाखन सिंह यांचा समावेश आहे. या आमदारांनी बसपा विधीमंडळ पक्षच काँग्रेसमध्ये विलीन केला होता. या घडामोडीनंतर बसपाच्या बैठकीत रामजी गौतम, माजी प्रदेशाध्यक्ष भगवानसिंह बाबा यांच्यासह काही नेत्यांना मारहाणही करण्यात आली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!