Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी करून दिली पाकिस्तानी बिर्याणीची आठवण , पंतप्रधान पवारांबाबत खोटा प्रचार करीत असल्याचा आरोप

Spread the love

महाजनादेश यात्रेच्या नाशिक येथील समारोपाच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रवादीचे नेते  शरद पवार यांच्यावर त्यांनी पाकिस्तानबाबत केलेल्या वक्तव्यावर निशाणा साधला.  काँग्रेसचे मी समजू शकतो पण शरद पवार यांना शेजारी देश चांगला वाटतो, ही त्यांची मर्जी पण पवारांसारख्या अनुभवी व ज्येष्ठ नेत्याने असं राष्ट्रहिताविरोधात वक्तव्य करणं दुर्दैवी आहे, असे पंतप्रधान म्हणाले होते. त्यावर पाकिस्तानातील शासक-प्रशासक आम्हाला नाही तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच चांगले वाटतात आणि म्हणूनच ते पाकिस्तानात नवाज शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेले होते, असा प्रत्यारोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

पंतप्रधानाच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीचांगलाच समाचार घेतला आहे. शरद पवार काय बोलले, याची माहिती न घेता पंतप्रधान चुकीचा व खोटा प्रचार करत आहेत. ते म्हणतात तसं विधान पवारांनी केलेलंच नाही. पाकचे राज्यकर्ते आणि सैन्यदलाचे लोक भारत विरोधी आहेत पण तेथील जनता मात्र तशी नाही, असे पवार म्हणाले होते, असे मलिक यांनी नमूद केले. पवारांच्या विधानाचा व्हिडिओ तपासण्याचे आव्हानही मलिक यांनी दिले. मोदींचे आरोप खरे ठरले तर आम्ही राजकारण सोडू आणि त्यात तथ्य आढळलं नाही तर मात्र त्यांनी देशाची माफी मागायला हवी, असे आव्हानच मलिक यांनी दिले.

पाकिस्तानचे राज्यकर्ते आणि शासनकर्ते आम्हाला नाही तर तुम्हालाच चांगले वाटतात. म्हणून तर तुम्ही काबूल येथून दिल्लीला येण्यासाठी निघालेले असताना विमान मध्येच उतरवून लाहोरला नवाज शरीफ यांचा वाढदिवस साजरा करायला व तिथे बिर्याणी खायला गेला होतात, असा निशाणाही मलिक यांनी साधला. पाकमधील राज्यकर्त्यांघरी बिर्याणी खाणाऱ्यांनी इतरांवर आरोप करू नयेत, असा टोलाही मलिक यांनी लगावला.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!