कल्याण डोंबिवलीच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचे निधन

Spread the love

कल्याण डोंबिवलीच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचे  आज ठाण्यात खासगी रुग्णालयात निधन झाले . गेल्या  १५ दिवसांपासून  त्या न्यूमोनिया आणि फुफ्फुसांचा संसर्ग झाल्यामुळे ठाण्यात हॉस्पिटलमध्ये होत्या. त्यांना स्वाईन फ्लू झाला होता, असे वृत्त न्यूज ८ लोकमतने दिले आहे. मंगळवारी (१० सप्टेंबर) दुपारी दीडच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कल्याणी पाटील या कल्याण पूर्वेतून २००५ आणि २०१० अशा दोन वेळा शिवसेनेकडून महापालिकेत निवडून गेल्या होत्या. २०१३ ते २०१५ अशी दोन वर्ष त्यांना महापौरपदही देण्यात आलं होतं. मात्र २०१५ च्या निवडणुकीत त्यांचा फक्त ५० मतांनी पराभव झाला. त्यांच्या निधनामुळे शिवसेनेचं मोठं संघटनात्मक नुकसान झाल्याची प्रतिक्रिया माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली आहे.

Advertisements

माजी महापौर कल्याणी पाटील यांच्या निधनामुळे पुन्हा एकदा स्वाईन फ्लूची भीती पसरली आहे. नेहमीच्या तापासारखा वाटणारा हा आजार कधीकधी जीवघेणा ठरू शकतो. विशेषतः प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना H1N1 ची लागण लवकर होते. मधुमेह असेल तर या विषाणूची लागण व्हायची शक्यता जास्त असते. जुलैपासून सुरू झालेल्या पावसाने सप्टेंबर उजाडला तरी  जोरदार बॅटिंग सुरू ठेवली आहे. त्यामुळे  स्वाईन फ्लूसारख्या विषाणूजन्य आजारांचा धोका वाढला आहे.

राज्यभरात या विषाणूजन्य आजाराचे रुग्ण वाढत आहेत. डेंग्यू, मलेरिया, व्हायरल फ्लूबरोबरच स्वाईन फ्लूची लागण झालेले रुग्ण वाढल्यामुळे काळजी वाढली आहे. वेळीच उपचार झाले नाहीत, तर स्वाईन फ्लू म्हणजेच H1N1 व्हायरसमुळे रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. स्वाईन फ्लू हा विषाणूजन्य आजार असून H1V1 या व्हायरसमुळे होतो,  या आजाराचं लवकर निदान होत नाही आणि धोका वाढतो. औषधोपचारास विलंब हे एक  या रोगाचे प्रमुख कारण आहे.  रुग्णांनी स्वत: सर्दी, तापावर गोळ्या औषध घेऊन आजार अंगावर काढल्याने गांभीर्य वाढते असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

Leave a Review or Comment

आपलं सरकार