जेवणातून औषध गोळ्या देते म्हणून मनरुग्ण मुलाने आईला पेटवून दिले

Spread the love

मनोरुग्ण असलेल्या मुलावर वैद्यकीय उपचार होण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरने दिलेल्या औषध गोळ्या जेवणातून का खाऊ घालतेस म्हणून रागाच्या भरात त्या मुलाने जन्मदात्या आईच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना बार्शी तालुक्यातील खांडवी येथे घडली. याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात संबंधिताविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisements

विद्या विनोद ठोंगे (वय ५५) असे दुर्दैवी जळीत मातेचे नाव आहे. तिच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तिचा मुलगा संतोष ठोंगे (वय २८) याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे विद्या ठोंगे यांचा मुलगा संतोष हा मनोरुग्ण असून अधूनमधून त्याचा मानसिक आजार बळावतो. त्यातून त्याच्या हातून कोणतेही आक्षेपार्ह कृत्य घडते. त्यामुळे आई विद्या ठोंगे यांनी त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडे नेऊन वैद्यकीय उपचार सुरू केले होते. डॉक्टरांनी आजार बरा होण्यासाठी दिलेल्या औषध गोळ्या संतोष यास जेवणातून द्यायच्या होत्या. त्याप्रमाणे आईकडून त्याला जेवणातून दररोज ठरल्याप्रमाणे औषध गोळ्या दिल्या जात होत्या. परंतु त्यामुळे संतोष हा आईशी नेहमीच वाद घालून भांडण करीत होता. त्याच्याकडून होणारा त्रास सहन करीत आईने त्याला आजार बरा होण्यासाठी औषधे घेण्याबाबत नेहमीच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु तो नेहमीच चिडायचा. रात्री उशिरा आई घरात जेवण करून झोपल्यानंतर संतोष याने रागाच्या भरात तिच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि काडेपेटीने पेटवले. यात ती भाजून गंभीर जखमी झाली. तिला वैद्यकीय  उपचारासाठी लातूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्य़ाची नोंद लातूर पोलिसांनी शून्य क्रमांकाने करून बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग केला आहे.

ठोंगे कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष याचा विवाह पाच वर्षांपूर्वी झाला असून त्याला एक मुलगा आहे. शालेय शिक्षणानंतर तो बांधकामावर मिस्त्री म्हणून काम करायचा. परंतु अलीकडे दीड वर्षांपासून त्याला मानसिक आजार बळावला. त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

Leave a Review or Comment

आपलं सरकार