Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरण : एसआयटी नियुक्त केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा संतप्त कुटुंबीयांचा पवित्रा , राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळेही आक्रमक

Spread the love

मुंबईतील चेंबूरमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी राज्य सरकार आणि पोलिसांची भूमिका संशयास्पद असून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे, असा थेट आरोप करतानाच या प्रकरणाची एसआयटीमार्फत पारदर्शकपणे चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

दरम्यान या प्रकरणावरून औरंगाबाद शहरातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या छाया जंगले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालूच असून पीडित मुलीचा मृत्यू होऊन तीन दिवस उलटत आले तरीही पोलिसांकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने मृतदेह घाटीच्या शवागारात पडून आहे. पोलिसांना संशयितांची नावे आणि पुरावे देऊनही आरोपीना अटक केली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. काल रात्री आमदार प्रशांत बंब यांनीही घाटी रुग्णालयाला भेट दिली होती.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर आज भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान सामूहिक बलात्काराच्या घटनेचा जाहीर निषेध करत सुप्रिया सुळे यांनी पोलीस, गृहखाते आणि राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडलं. या प्रकरणी आपण राज्याच्या पोलीस महासंचालकांची भेट घेणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

या प्रकरणी  राज्य सरकारवर ताशेरे ओढताना सुळे पुढे म्हणाल्या, की सामूहिक बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी असून आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत. या घटनेला आज एक महिना उलटून गेल्यानंतरही आरोपींना अटक झालेली नाही. हे सरकार असंवेदनशील आहे. पीडितांना न्याय देणे जमत नसेल तर गृहमंत्रालयाने याची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा अशी मागणी सुळे यांनी केली. या पुढे राज्यात मुलींवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासाचा अहवाल राज्य महिला आयोगाने मागवल्याच्या मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला आयोगावर टीकास्त्र सोडले. आम्ही मोर्चा काढल्यानंतर राज्य महिला आयोगाने अहवाल मागवण्याचे सुचले असे सांगताना राज्य महिला आयोग इतके दिवस झोपले होते का, असा संतप्त सवालही सुळे यांनी विचारला आहे.

जो पर्यंत राज्य सरकार या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय जाहीर करत नाही, तो पर्यंत पीडित मुलीचे कुटुंबीय अंत्यसंस्कार करणार नाही, असे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक यांनी जाहीर केले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला. पोलिसांनी आरोपींची ओळख परेडही घेतली नसल्याचे ते म्हणाले. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचाही त्यांचा आरोप आहे. दोषींना फाशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी मोर्चादरम्यान केली.

अत्याचाराची शिकार झालेल्या पीडित मुलीच्या मारेकरांच्या अटकेची मागणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा नेण्यात आला. पीडित मुलीचा एक महिन्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, महिना उलटला तरी आरोपींना अटक करण्यात न आल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुप्रिया सुळे यांनी हा मोर्चा आयोजित केला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण सहभागी झाल्या होत्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!