Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेचा पाठिंबा

Spread the love

काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्याबाबतच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याला जोरदार विरोध झाल्यानंतर ट्रम्प प्रशासनाने या वक्तव्यापासून घुमजाव केले आहे. काश्मीरप्रश्न हा भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा द्विपक्षीय मुद्दा असल्याचे अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. दोन्ही देशांकडून हा प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नांचे अमेरिका स्वागत करेल अशी भूमिकाही अमेरिकेने घेतली आहे. अमेरिकेने काश्मीरप्रश्नी भारताचे समर्थन केले आहे. भारतासोबत काश्मीरप्रश्नी चर्चा होण्यासाठी पाकिस्तानने दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीबाबतचा दावा फेटाळून लावला आहे. काश्मीर हा दोन देशांदरम्यानचा मुद्दा असून कसे आणि कोणत्या अटींवर याप्रश्नी चर्चा करायची हे या दोन देशांवर अवलंबून आहे, असे अमेरिका सतत सांगत आला आहे.  दोन्ही देशांमधील तणाव कमी होईल अशा भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या कोणत्याही प्रयत्नांना अमेरिकेचा पाठिंबाच असल्याचे अमेरिकेने निवेदनात स्पष्ट केले आहे. सर्वप्रथम दहशतवाद संपला पाहिजे हीच अमेरिकेची भूमिका असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन आठवड्यांपूर्वी काश्मीरप्रश्न सोडवण्यासाठी अमेरिकेने मध्यस्थी करावी असा आग्रह केल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. ही भूमिका आपण अतिशय आनंदाने पार पाडू, असेही ट्रम्प यांनी म्हटले होते. ट्रम्प यांच्या या भूमिकेचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वागत केले होते. ट्रम्प यांनी असे केले, तर त्यांना कोट्यवधी लोकांचे आशीर्वाद मिळतील असे खान यांनी म्हटले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!