Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुसळधार पावसाने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प, जगबुडी आणि वाशिष्ठी नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

Spread the love

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी (ता. खेड) आणि वाशिष्ठी (ता. चिपळूण) या दोन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सातारा जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे या दोन्ही नद्यांना पूर आल्याने मुंबई-गोवामहामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने या मार्गावरून  प्रवास करणाऱ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असले, तरी सातारा जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत असल्याने या दोन नद्यांना पूर आला आहे.

कोयना धरणाच्या परिसरातही जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे घाटातून वाहत कोकणात येणाऱ्या नद्यांना पूर आला आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदीच्या पाण्याची सध्याची पातळी ६.४० मीटर असून ६ मीटरनंतर धोक्याचा इशारा दिला जातो. त्यामुळे खेड शहरातील नदीकाठावरील लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पाण्याची पातळी आणखी वाढल्यास पुलावरील वाहतूक बंद करण्यात येणार असून त्याबाबत पोलीस प्रशासन व महामार्ग प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत.

चिपळूण शहरातून वाहणाऱ्या वाशिष्ठी आणि शिव नदीलाही पूर आला आहे. सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून पाण्याची पातळी वाढू लागली असून शहरातील बाजार पूल, वड नाका, खाटीक आळी हा भाग पाण्याखाली गेला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथील पूल पाण्याखाली गेल्याने पुलावरील महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ही वाहतूक गुहागर बायपासवरून वळवण्यात आली आहे. तसेच पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात आले असले, तरी त्या मार्गावरील बाजार पुलावरही पाणी आल्याने खेडकडून महामार्गावरून चिपळूण शहराकडे येणारी वाहतूक बंद पडली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!