Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

जादू टोण्याच्या संशयावरून शेतकरी कुटुंबाचा अमानुष छळ; विवस्त्र करत केली मारहाण, जनावराचे रक्तही पाजले !!

Spread the love

सटाणा तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबाने जादूटोणा केल्याच्या अंधश्रद्धेतून गावातील काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अंधश्रद्धाळू लोकांनी भोंदूबाबाच्या मदतीने शेतकरी कुटुंबाला विवस्त्र करत मारहाण केली, तसेच जनावराचे रक्त पाजत अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उघडकीस आणली आहे. विशेष म्हणजे या घटनेबाबत महिनाभरापूर्वी तक्रार करुनदेखील सटाणा पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे कुटुंब प्रमुखाने सांगितले.

सटाणा तालुक्यातील माऱ्हाळापाडा येथील एका शेतकरी कुटुंबाने गावात जादूटोणा केला, तसेच रोगराई पसरविल्याच्या संशयावरुन गावातीलच काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी काळू जगन्नाथ भगत या भोंदूबाबाच्या सल्ल्याने या कुटुंबाचा छळ सुरू केला. एवढ्यावर न थांबता मार्च महिन्यात या कुटुंबाला विवस्त्र करत मारहाण केली. तसेच, समाजातून बहिष्कृतही केले. भगताच्या सांगण्यावरुन मध्यरात्री स्मशानात नेत हाडांसमोर संबंधित गुन्हेगारांनी या कुटुंबाला जनावराचे रक्त पाजले. तसेच, त्यांच्यावर अघोरी अत्याचार केले. या घटनेची कुठे वाच्यता केल्यास सर्वांना जाळून ठार करण्याची धमकी दिली.एवढा अत्याचार होऊनही मोठ्या हिंमतीने पिडीत कुटुंबातील प्रमुखाने घडलेल्या घटनेबाबत १४ मे २०१९ रोजी सटाणा पोलिसांत तक्रार दिली. मात्र, तब्बल एक महिना उलटूनदेखील येथील पोलिसांनी अर्जाची दखलच घेतली नसल्याचा गंभीर आरोप पिडीत कुटुंबातील प्रमुखाने केला आहे. एवढ्या गंभीर घटनेकडे डोळेझाक करणाऱ्या पोलिसांच्या भूमिकेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दरम्यान, यासंदर्भात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली. या वेळी राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे, जातपंचायत मनमानी विरोधचे राज्य समन्वयक कृष्णा चांदगुडे, प्रा. सु. शिलकुमार, शशिकांत खडताळे, प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, विजय खंडेराव, प्रभाकर सिरसाठ आदी उपस्थित होते.कठोर कारवाईची मागणी शेतकरी कुटुंबाचा अमानुष छळ करत वाळीत टाकणाऱ्या क्रूर गुन्हेगारांवर जादूटोणा विरोधी कायदा व सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. तसेच, सरकारी खर्चाने लवकरात लवकर पिडीत कुटुंबाचे पुनर्वसन करावे. गावात जनप्रबोधनाचा कार्यक्रम घ्यावा, असेही निवेदनातून म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!