Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अनिल अंबानींकडून काँग्रेस आणि नॅशनल हेरॉल्ड विरोधातला ५ हजार कोटींचा मानहानीचा खटला मागे

Spread the love

अनिल अंबानी यांनी राफेल कराराच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राविरोधात केलेला पाच हजार कोटींचा मानहानीचा खटला मागे घेतला आहे. अहमदाबाद येथील न्यायालयात नॅशनल हेरॉल्डमध्ये आलेल्या राफेल कराराबाबतच्या लेखाविरोधात रिलायन्स समूहाने हा दावा दाखल केला होता. नॅशनल हेरॉल्डमध्ये राफेल कराराबाबत खोटी आणि अपमान करणारी माहिती छापल्याप्रकरणी अनिल अंबानी यांनी हा दावा दाखल केला होता. या खटल्यावर सत्र न्यायाधीश पी. जे. तमकुवाला यांच्या कोर्टात कामकाजही सुरु होते. आम्ही प्रतिवाद्यांना त्यांच्यावरचे खटले मागे घेत आहोत हे सूचित केले आहे अशी माहिती अंबानी यांचे वकील राकेश पारीख यांनी कोर्टात दिली.

दरम्यान मानहानीचा खटला मागे घेण्याबाबतच्या सूचना मिळाल्या असून कोर्टाच्या सुट्ट्या संपल्यानंतर हा खटला मागे घेण्याची औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे नॅशनल हेरॉल्ड आणि काँग्रेस नेत्यांचे वकील पी एस चंपानेरी यांनी सांगितले.

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स कंपनीने काँग्रेस नेते सुनील जाखड, रणदीपसिंह सुरजेवाला, ओमन चांडी, अशोक चव्हाण, अभिषेक मनु सिंघवी, संजय निरूपम या नेत्यांविरोधात आणि नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. काही पत्रकारांचाही यामध्ये समावेश होता. नॅशनल हेरॉल्डमध्ये अनिल अंबानी यांनी मोदींकडून राफेल कराराची घोषणा होण्याच्या दहा दिवस आधी रिलायन्स डिफेन्स ही कंपनी बनवली या आशयाचा लेख छापण्यात आला होता. मात्र यासंदर्भातला खटला मागे घेण्यात येत आहे अशी माहिती अंबानी यांच्या वकिलांनी कोर्टात दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!