मोदींना रोखा , अमेठीतील तरुणाने निवणूक आयोगाला रक्ताच्या शाईने लिहिले पत्र …

Advertisements
Spread the love

अमेठीमधील एका तरुणाने निवडणूक आयोगाला रक्ताने पत्र लिहिलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकांची मनं दुखावतील अशी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यापासून रोखण्यात यावं अशी मागणी केली आहे. मनोज कश्यप असं या तरुणाचं नाव असून अमेठीमधील शाहगडचा रहिवासी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधींविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे आपल्याला खूप मोठा धक्का बसला असल्याचं मनोज कश्यप यांनी सांगितलं आहे.

मनोज कश्यप यांनी पत्रात लिहिलं आहे की, ‘माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी मतदानाचं वय १८ पर्यंत आणलं, त्यांनी पंचायत राज प्रणाली आणली आणि देशात संगणक क्रांतीही त्यांच्यामुळेच आली’. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीदेखील आपल्या एका लेखात राजीव गांधी यांचं कौतुक केलं होतं याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे.

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, जी व्यक्ती राजीव गांधींचा अपमान करते ती अमेठीतील लोकांसाठी त्यांची हत्या करणाऱ्यांचा नातेवाईक आहे. राजीव गांधी अमेठीतील आणि देशभरातील लोकांच्या ह्रदयात राहतात असंही मनोज कश्यप यांनी म्हटलं आहे. दिवंगत राजीव गांधी यांच्यावर अशा प्रकारची टिप्पणी करण्यापासून पंतप्रधानांना रोखलं पाहिजे अशी मागणी मनोज कश्यप यांनी केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॅलीत बोलताना राजीव गांधी यांचा ‘भ्रष्टाचारी नंबर वन’ असा उल्लेख केला होता. यावर आक्षेप घेत मनोज कश्यप यांनी हे पत्र लिहिलं आहे. आपल्या पत्राचा राजकारणाशी काही संबंध नसून, आपलं राजीव गांधींशी भावनिक नातं असल्याचं नेहमी वाटतं असंही त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे आमदार दीपक सिंह यांनी ट्विटरवर हे पत्र शेअर केलं आहे.

Leave a Reply