Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

फनी चक्रवादळ : ओरिसामध्ये  मदतकार्य सुरू; बळींची संख्या २९ , मोदींचा पश्चिम बंगालच्या राज्यपालांना फोन

छायाचित्र सौजन्य : आऊटलूक

Spread the love

फनी चक्रीवादळाने ओदिशाच्या किनारी भागाला जोरदार धडक दिल्यानंतर दोन दिवसांनी, रविवारी या वादळातील बळींची संख्या २९ वर पोहोचली आहे. या वादळामुळे फार मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून, लोकांना पाण्याची टंचाई तसेच खंडित झालेला वीजपुरवठा यांचा सामना करावा लागत आहे. राज्य सरकारने वादळग्रस्त भागात मदतकार्य सुरू केले असून या नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्यांसाठी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मदतीच्या पॅकेजची घोषणा केली आहे.

पुरीतील सर्व कुटुंबांना आणि खुर्दा जिल्ह्य़ातील ज्या भागांना वादळाचा ‘अतिशय जास्त फटका’ बसला आहे, तेथील कुटुंबांना (अन्न सुरक्षा कायद्याचे संरक्षण असल्यास) ५० किलो तांदूळ, रोख २ हजार रुपये आणि पॉलिथिन शीट्स मिळतील, असे त्यांनी सांगितले. ‘तीव्र’ तडाखा बसलेल्या खुर्दा जिल्ह्य़ाच्या उर्वरित भागातील कुटुंबांना तांदळाचा एक महिन्याचा कोटा, रोख १ हजार रुपये आणि पॉलिथिन शीट्स मिळणार आहेत. वादळाचा ‘सौम्य फटका बसलेल्या’ कटक, केंद्रपाडा व जगतसिंगपूर हे जिल्हे तांदळाचा एक महिन्याचा कोटा आणि रोख ५०० रुपये मिळण्यास पात्र राहतील, असेही पटनायक म्हणाले.

वादळामुळे ‘पूर्णपणे नष्ट झालेल्या’ घरांसाठी ९५१०० रुपयांची, ‘अंशत: नुकसान झालेल्या’ घरांसाठी ५२०० रुपयांची आणि किरकोळ नुकसान झालेल्या घरांसाठी ३२०० रुपयांची मदत देण्याचीही घोषणा पटनायक यांनी केली. वादळाचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या पुरी शहरातील ७० टक्के भागांमध्ये आणि राजधानी भुवनेश्वरमधील ४० टक्के भागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत झाला असल्याचे पटनायक यांनी सांगितले. पुढील १५ दिवस अन्न मोफत पुरवण्याची व्यवस्था सरकारने केली आहे. याशिवाय वृक्षारोपणाची मोहीमही मोठय़ा प्रमाणावर हाती घेतली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मोदींचा पश्चिम बंगालच्या राज्यपालांना फोन

फनी वादळानंतर पश्चिम बंगालमधील परिस्थितीबाबत विचारपूस करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाच दूरध्वनी केला होता पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे त्यांनी शेवटी राज्यपालांना दूरध्वनी करून विचारपूस केली, असे स्पष्टीकरण सरकारी अधिकाऱ्याने केले आहे.

पंतप्रधानांनी वादळाबाबत राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांना दूरध्वनी करून विचारपूस केली, पण मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मला विचारपूस करून माहिती घेणे आवश्यक होते, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते. पंतप्रधान मोदी यांनी राज्यपालांशी झालेल्या चर्चेबाबत ट्विट केले होते. अधिकाऱ्याने सांगितले,की पंतप्रधान मोदी यांच्या कर्मचाऱ्यांनी मोदी यांना ममता बॅनर्जी यांच्याशी बोलता यावे यासाठी दूरध्वनी केला होता, पण दोनदा प्रयत्न करूनही योग्य उत्तरे मिळाली नाहीत. एकवेळ मुख्यमंत्री दौऱ्यावर आहेत असे सांगण्यात आले. त्यामुळे नाईलाजास्तव मोदी यांना राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांना दूरध्वनी करून माहिती घेण्यावाचून पर्याय उरला नाही असेही सरकारी सूत्रांनी म्हटले आहे. फॅनी वादळ शनिवारी रात्री साडेबारा वाजता पश्चिम बंगालमध्ये आले, पण तोपर्यंत त्याची तीव्रता कमी झालेली असल्याने त्यात फारशी हानी झाली नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!