Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Suresh Patil : जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांची विष पिऊन आत्महत्या

Spread the love

#एका मुरब्बी राजकीय व्यक्तिमत्वाची शोकांतिका ….

मी खूप थकलोय , पडतो … असे सांगून ७८ वर्षांचे सुरेश पाटील कायमचेच झोपले . सुरेश दयाराम पाटील ऊर्फ दादा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मोठे कार्यकर्ते होते . सहकार क्षेत्रात सुरेश पाटील यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय होते. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. कुशल प्रशासक अशी त्यांची स्वत:ची एक वेगळी ओळख होती. त्यांनी विष प्रश्न करून आत्महत्या केली. सुसाईड नोट लिहून ठेवली . त्यात लिहिले कि , सदाशिव गायके आणि नाना पाटील यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहे . वेळ : दुपारी ११ वाजून ५२ मिनिटे .”” पोलिसांनी या प्रकरणात रात्री उशिरा सदाशिव गायके आणि नाना पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे . या घटनेमुळे औरंगाबादच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सुरेश पाटील हे माजी आमदार नितीन पाटील यांचे वडील होते . गेल्या काही वर्षांपासून ते कोर्ट कचेऱ्यांच्या फेऱ्या मारून त्रस्त झाले होते आणि प्रचंड मानसिक तणावात होते आज त्यांची अशी अखेर झाली …
“महानायक ओनलाईन”ची त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!

या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि ,
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश दयाराम पाटील ऊर्फ दादा (वय ७८) यांनी सोमवारी (दि. २५) दुपारी समर्थनगरातील निवासस्थानी विष पिऊन आत्महत्या के ली. या घटनेने खळबळ उडाली असून, सहकार आणि राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली. पाटील यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून, आत्महत्येसाठी अ‍ॅड. सदाशिव गायके आणि नाना पाटील हे जबाबदार असल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी रात्री उशिरा गायके आणि नाना पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील आणि अ‍ॅड. गायके यांच्यात अनेक वर्षांपासून वाद आहे. गायके यांनी सुरेश पाटील यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी केलेल्या असून, त्यावरून गुन्हे दाखल आहेत. जिल्हा बँकेतील सर्वसाधारण सभेत गायके यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणाची सोमवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी होती. नेहमीप्रमाणे सुरेश पाटील, रायभान मदगे आणि दयाराम साळुंके हे तिघे सुनावणीसाठी सकाळी ११ वाजता न्यायालयात गेले होते. ते न्यायालयात असताना सुरेश पाटील यांना वेदांतनगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी फोन करून तुमच्याविरुद्ध सदाशिव गायके यांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार नोंदविल्याचे सांगितले. न्यायालयीन कामकाज आटोपून सुरेश पाटील पावणेबारा वाजेच्या सुमारास समर्थनगरातील निवासस्थानी गेले. ‘खूप थकलो, मी पडतोय,’ असे पत्नीला सांगून ते त्यांच्या रूममध्ये गेले आणि आतून दरवाजा बंद केला. त्यानंतर त्यांनी रूममध्ये विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.

दरवाजा तोडावा लागला…
त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश पाटील यांचे चिरंजीव माजी आमदार नितीन पाटील, नातू निशांत यांनी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास जेवण केले. आजोबांनी जेवण केले नसल्याचे समजल्याने निशांत त्यांना उठविण्यासाठी गेला. दरवाजा वाजविला. मोबाईल कॉल केला. रूममधील लॅण्डलाईन फोन करूनही त्यांनी आतून प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नितीन यांच्या सांगण्यावरून निशांतने रूमच्या मागील खिडकीतून आत डोकावून पाहिले, तेव्हा आजोबा बेडवर पडलेले दिसले. नितीन पाटील यांनीही खिडकीतून पाहिले व नंतर दरवाजा तोडला. बेशुद्धावस्थेत त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी पाटील यांना तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. सुरेश पाटील यांना डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर नितीन पाटील, निशांत पाटील आणि नातेवाईक लगेच सुरेश पाटील यांना घेऊन घरी आले. त्यानंतर पाटील यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात नेऊन त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. ज्या खोलीत सुरेश पाटील यांनी आत्महत्या केली त्या खोलीत विषाची बाटली आणि सुसाईड नोट आढळली. या सुसाईड नोटमध्ये सदाशिव गायके आणि नाना पाटील यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सुरेश पाटील यांनी लिहून ठेवल्याची माहिती क्रांतीचौक पोलिसांनी दिली. या चिठ्ठीवर ११ वाजून ५२ मिनिटे असा वेळही टाकला आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
सुरेश पाटील यांनी राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केल्याचे कळताच पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहायक आयुक्त एच. एस. भापकर, सहायक आयुक्त डॉॅ. नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक उत्तम मुळक , उपनिरीक्षक कोमल शिंदे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन नितीन पाटील यांच्याकडून घटनेची माहिती जाणून घेतली. तपासाचा भाग म्हणून पोलिसांच्या न्याय सहायक प्रयोगशाळेतील तज्ज्ञांनी सुरेश पाटील यांनी ज्या खोलीत आत्महत्या केली त्या खोलीतील विषाची बाटली, सुसाईड नोट जप्त केली असून पुढील तपास चालू आहे.

दरम्यान पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी या प्रकरणात बोलताना सांगितले कि , शवविच्छेदन अहवालात पाटील यांचा मृत्यू विष प्याल्याने झाल्याचे समोर आले. त्यांच्या खोलीत पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत त्यांनी नमूद केले की, २० वर्षांत सदाशिव गायके आणि नाना पाटील यांनी विविध केसेस करून त्रास दिला. त्यांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत आहे. त्यांच्याशिवाय कोणालाही जबाबदार धरू नये, असे स्पष्टपणे लिहिले आहे. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात चिठ्ठीत नावे असलेल्या दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गायके यांची अपहरणाची तक्रार
अ‍ॅड. सदाशिव गायके यांनी सोमवारी सकाळी वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती कि , कारमधून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी कोकणवाडी येथे आपले अपहरण करण्याचा प्रयत्न केला. सुरेश पाटील, नितीन पाटील आणि जयराम साळुंके विरोधात तक्रार करतो का, आज तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून बळजबरीने कारमधून बसविण्याचा प्रयत्न केला. या तक्रारीवरून वेदांतनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अत्यंविधी दुपारी 3 वा. नागद (ता.कन्नड) येथे
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांचा अत्यंविधी दुपारी 3 वा. नागद (ता.कन्नड) येथे होणार आहे. त्यांचे पार्थीव सकाळी ९ ते १० औरंगाबाद येथील समर्थनगर येथील निवासस्थानी, सकाळी १०.३० ते ११.३० वा. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत, दुपारी १.३० ते २.३० वा. नागद (ता.कन्नड) येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी शकुंतला पाटील, मुले माजी आमदार नितीन पाटील, सचिन पाटील, मुलगी डॉ.संगीता विनोद शिसोदे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!