Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

केंद्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी पुनरावलोकन समिती

Spread the love

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने क्रीडा पुरस्कार योजनेच्या पुनरावलोकनासाठी आज निवृत्त न्यायमूर्ती इंदरमीत कौर कोचर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समितीची स्थापना केली. क्रीडा पुरस्कारांमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. दरम्यान, समितीने दहा दिवसांत आपला अहवाल सादर करावा, असे नमूद करण्यात आले आहे. न्या. इंदरमीत कौर कोचर यांच्या अध्यक्षतेखालील समितीत ऑलिम्पिकपटू शिवा केशवन, माजी स्टार धावपटू अश्विनी नाचप्पा, इन्फोसिसचे माजी अधिकारी मोहनदास पई, टाइम्स डिजिटलचे मुख्य संपादक राजेश कालरा यांचा समावेश आहे. क्रीडा मंत्रालयाचे उपसचिव वा संचालक (क्रीडा पुरस्कार विभाग) हे या समितीचे सहावे सदस्य असणार आहेत.
ही समिती प्रामुख्याने क्रीडा पुरस्कार योजनेंतर्गत देण्यात येणारे पुरस्कार व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विशेष कामगिरीसाठी खेळाडू व त्यांच्या प्रशिक्षकांना देण्यात येणाऱ्या रोख रकमेच्या पुरस्कारांचे पुनरावलोकन करणार आहे. त्यात विशेषत: राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, राष्ट्रीय खेलरत्न प्रोत्साहन पुरस्कार, मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी या पुरस्कारांचं पुनरावलोकन केलं जाणार आहे.
आवश्यकता असल्यास योजनेच्या नावात बदल करण्याचा तसेच पुरस्काराची रक्कम वाढवण्याचा वा कमी करण्याचा अधिकार या समितीला बहाल करण्यात आला आहे. त्यासोबतच दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची संख्या ही समिती ठरवणार आहे. पुरस्कारांचे निकष व पात्रता याची समीक्षाही समितीकडून केली जाणार आहे. रोख पुरस्कारांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील अन्य खेळांनाही स्थान देण्याबाबतची शिफारस ही समिती करणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!