Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Malegaon Bomb Blast Case Verdict : मोठी बातमी : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता…

Spread the love

मुंबई :  मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित बहुप्रतिक्षित खटल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालय गुरूवारी निकाल दिला. हा निकाल देताना विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांची पुराव्याअभावी सुटका केली.

बॉम्बस्फोट झाला, मात्र मोटोरसायकलमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आले. आरडीएक्स प्रसाद पुरोहितने आणले हे सिद्ध होऊ शकलेले नाही. त्याच्याविरुद्धचे आरोप सिद्ध झाले नाहीत. ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला त्या ठिकाणाहून वैज्ञानिक पुरावे जमा केले गेले नाहीत. साध्वीच्या मोटाईसायकलचा स्फोट झाल्याचा आरोप आहे. पण ही मोटारसायकल तिच्या मालकीची असल्याचे सिद्ध करण्यात अपयश आल्याचे न्यायालयाने आरोपींची सुटका करताना स्पष्ट केले.

१७ वर्षानंतर निकाल…

प्रदीर्घ काळानंतर ऑक्टोबर २०१८ मध्ये विशेष एनआयए न्यायालयाने आरोपींवर दहशतवादाच्या आरोपांतर्गत आरोपनिश्चिती केली आणि खटल्याच्या नियमित सुनावणीला अखेर सुरुवात झाली. सात वर्षांच्या सुनावणीनंतर १९ एप्रिल २०२५ रोजी फिर्यादी आणि आरोपींचा युक्तिवाद पूर्ण झाल्याचे जाहीर करून खटल्याचा निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणी विशेष न्यायालयाने गुरूवारी उपरोक्त निकाल दिला. खटला सुरू असताना प्रकरणातील सगळ्या आरोपींना उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यामुळे, सगळे आरोपी जामिनावर बाहेर होते.

आरोप काय होते …?

आरोपींविरोधात यूएपीए कलम १६ (दहशतवादी कृत्य करणे) आणि १८ (दहशतवादी कृत्याचा कट रचणे) १२० (ब) (गुन्हेगारी कट), ३०२ (खून), ३०७ (खून करण्याचा प्रयत्न), ३२४ (स्वेच्छेने दुखापत करणे) आणि १५३ (अ) (दोन धार्मिक गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) आदी भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांतर्गत खटला चालवण्यात आला.

३० साक्षीदारांचा मृत्यू, ३४ फितूर

देशातील दहशतवादाशी संबंधित दीर्घकाळ चाललेल्या खटल्यांपैकी हा एक खटला आहे. विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह आणि पुरोहित यांच्यासह प्रकरणातील शकत आरोपींवर बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड विधान आणि शस्त्रास्त्र कायदा अशा महत्त्वाच्या कायद्यांतंर्गत दहशतवादाच्या आरोपाप्रकरणी खटला चालवला. खटल्यात एनआयएतर्फे ३२३ साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदवण्यात आले, तर आरोपपत्रात उल्लेख असलेल्या जवळपास ३० हून अधिक साक्षीदारांची साक्ष देण्यापूर्वीच मृत्यू झाला.

याशिवाय, त्यापैकी ३४ साक्षीदार फितूर झाले. हे साक्षीदार पुरोहित आणि कथित कट रचण्याच्या बैठकांशी संबंधित होते. तथापि, बॉम्बस्फोटांचा कट रचण्याबद्दल आरोपींनी केलेल्या कोणत्याही चर्चेत आपण सहभागी झाल्याचे किंवा ही चर्चा ऐकल्याचे या साक्षीदारांनी नाकारले. प्रकरणाचा सुरुवातीचा तपास करणाऱ्या राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) जबरदस्तीने, बेकायदेशीररित्या आपल्याला ताब्यात घेतले आणि काही व्यक्तींची नावे सांगण्यास, खोटे विधान करण्यास धमकावल्याचा आरोपही या साक्षीदारांनी साक्ष नोंदवताना केला होता.

प्रकरण काय ?

मुंबईपासून सुमारे २०० किमी अंतरावर असलेल्या मालेगाव येथील मशिदीजवळ २९ सप्टेंबर २००८ रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन सहा जण ठार आणि १०० हून अधिक जखमी झाले होते. सुरूवातीला राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) या प्रकरणाचा तपास केला होता. त्यानंतर, प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, नंतर एनआयएकडे वर्ग केला गेला. प्रकरणाच्या तपासाची सूत्रे घेतल्यानंतर एनआयएने २०१६ मध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. त्यात, साध्वी यांच्यासह श्याम साहू, प्रवीण टाकळकी आणि शिवनारायण कलसंग्रा यांच्याविरोधात पुरावे नसल्याचा दावा करून त्यांना दोषमुक्त करण्याची मागणी एनआयएने केली होती. तथापि, साध्वीविरोधात खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे स्पष्ट करून विशेष न्यायालयाने तिच्यावर दहशवादाचा आरोप निश्चित केला होता.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

दरम्यान, या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन काँग्रेस प्रणित यूपीए सरकारवर टीका केली आहे. ‘काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी’, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने हिंदू आतंकवादाचा, भगव्या आतंकवादाचा नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता, निवडणुकीत अल्पसंख्याकांचे लांगून चालन करण्यासाठी हिंदू आतंकवाद आहे, भगवा आतंकवाद आहे, अशा प्रकारचा प्रचार केला होता, तो प्रचार किती खोटा होता हे आज उघड झालं आहे. ज्या प्रकारे षडयंत्र रचून भगवा आतंकवाद दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. मात्र, तो प्रयत्न किती खोटा होता हे न्यायालयाने पुराव्यानिशी सांगितलं आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!