CYCLONE FANI ALERT : येत्या १२ तासात ‘ फणी ‘ चक्री वादळाचा हवामान खात्याचा इशारा

https://twitter.com/WinnyWeather/status/1122509749067616257
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेच्या दक्षिणेकडील समुद्रात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्याची तीव्रता वाढत जाऊन येत्या १२ तासांत तामिळनाडूलगतच्या समुद्रात चक्रीवादळाचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. या चक्रीवादळाचे नाव ‘फनी’ असे सांगण्यात येत आहे. ‘फनी’ या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने दक्षिणेकडील राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून तामिळनाडूच्या उत्तरेकडील किनार्यासोबत आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनार्यावरही हे वादळ धडकू शकते. हे वादळ भीषण रुप धारण करण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. फनी चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातही पावसाळी स्थिती निर्माण होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
उत्तर आणि मध्य भारतात कडाक्याचे ऊन पडत आहे. मात्र दुसर्या बाजूला दक्षिण भारतात चक्रीवादळ आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. फनी वादळामुळे २९ आणि ३० एप्रिल रोजी केरळमध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच ३० एप्रिल आणि एक मे रोजी उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्रच्या काही भागातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूत रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून या भागातील मासेमारांना समुद्रात न जाण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच किनारपट्टीच्या भागातील नागरिकांनीही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, २०१८ मध्ये ‘गाजा’ चक्रीवादळाने खूप नुकसान केले होते. या वादळाच्या तडाख्यात जवळपास ४० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता.