AurangabadNewsUpdate : रयतेनेच पडदा बाजूला सारला आणि औरंगाबादच्या क्रांती चौकात जल्लोषात झाले शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण…

औरंगाबाद : औरंगाबादच्या लौकिकात भर टाकणाऱ्या आणि लाखो औरंगाबादकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आले. ढोल ताशांचा गजरात , फटाक्यांच्या आतषबाजीत आणि, लाईट शोचा प्रकाश झोतात हा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावण्यासाठी हजारो औरंगाबादकर जय भवानी , जय शिवाजीच्या घोषणा देत आणि हातात भगवे ध्वज घेऊन आले होते. विशेष म्हणजे रयतेच्या राजाच्या पुतळ्यावरील पडदा रायतेनेच दूर केला तेंव्हा शिवरायांच्या या भव्य पुतळ्याचे विलोभनीय दर्शन होताच शिवाजी महाराजांच्या घोषणांनी अवघा आसमंत दणाणून गेला.
या लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात,पालकमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील, खासदार छत्रपती संभाजी राजे, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, आमदार सतीश चव्हाण, शिवसेनेचे संपर्कनेते विनोद घोसाळकर, आ. अंबादास दानवे, आ.संजय शिरसाट, आ.प्रदीप जैस्वाल, आ.हरीभाऊ बागडे, आ. अतुल सावे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, माजी सभापती राजू वैद्य यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
क्रांती चौकातील शिवयारांचा पुतळा सर्वात उंच ५२ फूट उंचीचा आहे. गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने शिवजगार महोत्सव चालू आहे. त्यामुळे या विलोभनीय पुतळ्याच्या दर्शनासाठी औरंगाबादकरांची अलोट गर्दी झाली होती. आज रात्री पुतळ्याच्या लोकार्पणाची महापालिकेने जय्यत तयारी केली होती. शेकडो दिव्यांच्या प्रकाशाने परिसर उजळून निघाला. पुतळ्याला सर्वत्र फुलांची सजावट करण्यात आली होती. हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी सायंकाळपासूनच क्रांती चौकात गर्दी झाली होती.
कार्यक्रमात व्यत्यय येऊ नये म्हणून पोलिसांनी सिल्लेखाना, दूधडेअरी चौक, जिल्हान्यायाल व गोपाळ टी हाऊस चौकात रस्ते बंद केले होते. क्रांती चौकाकडे येणारे हे चारही रस्ते शिवप्रेमींनी दुमदुमुन गेले होते. हातात भगवे ध्वज, जयभवानी जय शिवाजीच्या घोषणा देत तरुण, तरुण, महिला-पुरुषांनी प्रचंड गर्दी केली. रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास आदित्य ठाकरे, सुभाष देसाई यांचे आगमन झाले. श्री. ठाकरे यांनी शिवप्रभुंच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्यांच्या हस्ते मशाल पेटवण्यात आली. त्यानंतर लाईट आणि साउंड शो सुरु झाला व फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी भगवा झेंडा हातात भगवा झेंडा घेवून त्यांनी तो फिरवला. त्यानंतर शिवप्रेमींनी डी जे च्या तालावर ठेका धरला. अनेकांनी चारचाकी वाहने, परिसरातील इमारती, अग्निशमन, पोलिसांच्या वाहनांवरच चढून हा ऐतिहासिक सोहळा पाहिला. क्रांती चौकात येणाऱ्या चारही रस्त्यांवर एक ते दीड किलोमीटरपर्यंत शिवप्रेमींची अलोट गर्दी होती. अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रंचड पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत शिवप्रेमी क्रांती चौकात तळ ठोकून होते.
महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडे , विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर , जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता , ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक निमित्त गोयल , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.