भीषण अपघात !! ट्रॅक्टर विहिरीत कोसळला , ९ जणांचा मृत्यू झाल्याची भीती…

नांदेड: नांदेड शहरानजीक असणाऱ्या आलेगाव शिवारात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं शेजमजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने मोठी जिवीतहानी झाली आहे. ट्रॅक्टरमध्ये शेतकरी महिला मजूर होत्या. त्या हळद काढण्यासाठी जात होत्या. दरम्यान, मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला आहे. यात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सदर ट्रॅक्टर हा एक १५ वर्षाचा मुलगा चालवत होता, अशी धक्कादायक माहिती पुढे येत आहे. मागील तीन तासांपासून विहिरीत पडलेल्या महिला पुरुषांना बाहेर काढण्याचे प्रयत्न परिसरातील ग्रामस्थांकडून सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहराजवळच्या आलेगाव शिवरात ही घटना घडली. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या गुंज गावातील काही शेतकरी महिला मजूर आलेगाव शिवारात हळद काढायला आल्या होत्या. ट्रॅक्टरमध्ये बसून हळद काढण्यासाठी जात असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि जवळपास १२ महिला आणि पुरुष मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला.
ही घटना शुक्रवारी पहाटे सात वाजेच्या सुमारास घडली. विहिरीत पडलेल्या पैकी दोन महिला आणि एका पुरुषाला वर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. परंतु मागील तीन तासापासून मदतीसाठी कोणतीही यंत्रणा पोहोचली नसल्याने विहिरीत पडलेल्यांपैकी ९ जण मृत झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं. ग्रामस्थांनी दोन महिलांसह एका पुरुषाला विहिरीतून बाहेर काढलं आहे. मात्र अद्याप सात ते आठ जण विहिरीत अडकल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. हिंगोलीसह नांदेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालेले असल्याने विहिरीमध्ये ट्रॅक्टर पूर्णपणे बुडाला आहे.
ट्रॅक्टरचे केवळ एक टायर दिसत आहे. ट्रॅक्टर मध्ये नेमके किती जण होते, याची माहिती मिळाली नाही. पण पाण्याने भरलेल्या विहिरीत ट्रॅक्टर पडल्याने इतर सर्वजणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या पोलीस घटनास्थळी ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य करत आहेत. प्रशासकीय यंत्रणा देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. मजुरी करण्यासाठी आलेल्या महिलांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.