MaharashtraNewsUpdate : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा झटका

अकोला : राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांना अकोला जिल्ह्यातील हिंगणा येथे एका जाहीर सभेत बोलत असताना अचानक अर्धांगवायूचा सौम्य झटका आला. त्यांना तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
या विषयीची अधिक माहिती अशी कि , राष्ट्रवादीत दाखल झालेल्या गायिका वैशाली माडे या अकोल्या दौऱ्यावर होत्या. त्यांच्याकडे राष्ट्रवादी सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बिफॉर्म कॉलेजमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अमोल मिटकरी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले . त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली ‘माझी मैना गावाकड राहिली..’ ही छक्कड गायला सुरुवात केली. पण, अचानक मिटकरी यांचा आवाज बसला आणि त्यांचा चेहरा वाकडा होत असल्याचे जाणवू लागले, त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन त्यांना सांभाळलं. त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान अमोल मिटकरी यांना अर्धांग वायूचा सौम्य झटका आला होता. त्यामुळे कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला. अमोल मिटकरी यांच्या प्रकृतीत आज सुधारणा होत आहे. माझी प्रकृती आता ठीक असून कोविडची परिस्थिती असल्यामुळे कोणीही मला भेटायला येऊ नये, मी आता ठीक आहे, अशी विनंती मिटकरी यांनी केली आहे.