Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यास महाराष्ट्र सज्ज : मुख्यमंत्री

Spread the love

मुंबई : कोविड काळात उत्पादन न थांबविता उद्योगांचे व्यवहार सुरू राहिले हे उदाहरण महाराष्ट्राने देशाला घालून द्यावे तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी देखील कोविडविषयक टास्क फोर्स स्थापन करावा आणि  सचिवालयामार्फत याचे संनियंत्रण करावे असे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत. कोविड काळात देखील उद्योगांचे अर्थचक्र सुरू राहावे, उत्पादनांमध्ये अडथळे येऊ नये या दृष्टीने व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी ऑक्सिजन उत्पादन, साठा यांचे नियोजन तसेच उद्योगांतील कामगार- कर्मचारी यांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण, निर्बंध कडक करावे लागले तरी आर्थिक चक्र सुरू ठेवणे, उत्पादनावर परिणाम होऊ न देणे, कामगारांची कंपनीच्या परिसरातील तात्पुरती फिल्ड निवास व्यवस्था, कामाच्या वेळा, कोविड प्रादुर्भाव होऊ न देणारी व्यवस्था (बायो बबल) यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीआयआयच्या पदाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली.

या ऑनलाइन बैठकीत सीआयआयचे पदाधिकारी उदय कोटक, निरंजन हिरानंदानी, हर्ष गोयंका, सलील पारेख, नील रहेजा, अनंत गोयंका, बाबा कल्याणी, बी त्यागराजन, जेन करकेडा, अनंत सिंघानिया, बनमाली अग्रवाल, निखिल मेसवाणी, अश्विन यार्दी, राशेष शहा, केशव मुरुगेश, भारत पुरी, असीम चरनिया, सुनील माथुर, संजीव सिंग, नौशाद फोर्बस, डी के सेन, सुलज्जा फिरोदिया मोटवाणी, शरद महिंद्रा, आदी उद्योगपती सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, आज सुमारे १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन राज्यात केले जाते. येणाऱ्या काळात कोविडचे आव्हान अधिक वाढले तर ऑक्सिजनची मागणी दुसऱ्या लाटेपेक्षा देखील अधिक भासू शकते. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीबरोबरच ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवणे, त्यासाठी टँक्स, सिलिंडरची आवश्यकता आहे.

डेल्टाच्या नव्या विषाणूमुळे अधिक काळजी घ्यावी लागणार असून, अनेक देशांनी परत निर्बंध लावण्यास व काळजी घेण्यास सुरुवात केली आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आणखी काही महिने तरी आपल्याला मास्क नियमित वापरणे, हात सातत्याने धुत राहणे, अंतर पाळणे व स्वच्छता ठेवणे याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे लागणार आहे. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास आदींची उपस्थिती होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!