AurangabadNewsUpdate : कंपनी मालकाला विदेशी भामट्यांनी १८ लाखांना आॅनलाईन गंडविले

औरंगाबाद : कच्चा माल मागविण्यासाठी ई-मेलवर संपर्क करून एका कंपनीच्या मालकाला विदेशी भामट्यांनी १८.२८ लाखांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ३ ते ४ नोव्हेंबर २०२० याकाळात घडला. कच्चा माल तयार असल्याचे सांगत अगोदर पैसे पाठवावे लागतील असे म्हणत विश्वासघात केल्याचे कंपनी मालकाने तक्रारीत म्हटले आहे.
सिडकोतील कंपनी मालक विनायक शंकरराव देवळाणकर (५४, रा. प्लॉट क्र. ६२, ए-१, एन-४) यांची वाळुज एमआयडीसी भागात मनु इलेक्ट्रीकल्स नावाची कंपनी आहे. ते कंपनीसाठी बाहेर देशातून कच्चा माल मागवतात. कंपनीला कच्च्या मालाची आवश्यकता होती. म्हणून सप्टेंबर-२०२० पासून गोविंदनगर, बन्सीलालनगर जवळील एका प्रतिनिधीच्या माध्यामातून देवळाणकर हे कंपनीच्या संपर्कात होते. ते ई-मेल आयडीवरुन कंपनीशी समन्वय साधत होते. इलेक्ट्रॉनिक्सचा कच्चा माल विकत घेण्यासाठी ई-मेलव्दारे संपर्क साधण्यात आला. तेव्हा संपर्क साधलेल्या मेलवरुन सांगण्यात आले की, ‘आमचे मटेरीयल तयार आहे, मालाचे तुम्हाला अगोदर पेमेंट करावे लागेल.
व्यवसाय करताना दुस-या कंपनीवर व्यवहाराविषयी विश्वास ठेवावा लागतो.’ त्याप्रमाणे त्या प्राप्त झालेल्या मेलवर देवळाणकर यांनी विश्वास ठेवला. त्यानंतर वाळुज एमआयडीसीतील बँकेतून कोरीयातील बँक खात्यावर रक्कम पाठविण्यासाठी बँकेला अर्ज केला. कागदपत्रांची पुर्तता करुन सांगितल्यानुसार २३ आॅक्टोबर २०२० रोजी भारतीय चलनानुसार १८ लाख २८ हजार ३१७ रुपये डॉलरमध्ये २४ हजार ५६७. ७२ पैसे एवढी रक्कम बँक खात्यावर पाठविण्यात आली. त्यानंतर दोन दिवसांनी संबंधीत कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून माल निघाला किंवा नाही, निघाला नसेल तर केव्हा निघणार आहे अशी देवळाणकर यांचनी चौकशी केली. तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, ‘तुमचे पैसे कंपनीला पोहोचले किंवा नाही. याची खात्री करतो व तुमचा माल पाठवायला सांगतो.’ असे कळविण्यात आले.
२६ आॅक्टोबर रोजी देवळाणकर यांना फोन करुन सांगण्यात आले की, तुमचे पैसे आमच्या कंपनीला मिळाले नाही. त्यावरुन २७ आॅक्टोबर रोजी देवळाणकर यांनी खाते असलेल्या कोटक महिंद्रा बँकेत जाऊन चौकशी केली. तेव्हा बँकेने सांगितले की, तुमचे पैसे तुम्ही दिलेल्या कंपनीच्या बँक खात्यात पोहोचले आहेत. त्यामुळे देवळाणकर यांनी पुन्हा त्या कंपनीशी संपर्क साधला. त्यावेळी कंपनीने हे बँक खाते आपले नसल्याचे देवळाणकर यांना सांगितले. तसेच तुम्ही ज्या मेलच्या प्रिन्टआऊट दाखवल्या त्याचा वेगळा आयडी असून आमच्या कंपनीचा नाही. त्यावरुन आॅनलाईन फसवणूक झाल्याचे देवळाणकर यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रारी अर्ज दिला. त्या अर्जावरुन मंगळवारी एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.