AurangabadNewsUpdate : व्यापक जनजागृती आणि ॲण्टीजेन चाचण्यांमुळे कोरोना आटोक्यात -जिल्हाधिकारी उदय चौधरी

औरंगाबाद : व्यापक जनजागृतीव्दारे लोकसहभागातून आणि ॲण्टीजेन चाचण्यांमुळे रुग्णांचे निदान वेळेत होण्याची संख्या वाढत असून कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज येथे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या प्रमुखांसोबतच्या बैठकीत जिल्हाधिकारी चौधरी बोलत होते यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय, जिल्ह्यातील राजकीय पक्षाचे पमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, कोरोना मुक्तीसाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न सुरु असून लोकांच्या सहकार्यामुळे प्रशासनाच्या उपाययोजनांना यश मिळत आहे. सध्या जिल्ह्यात रुग्ण संख्या दुप्पट होण्याचे प्रमाण हे आटोक्यात आलेले आहे. त्यासोबतच मृत्युदर कमी करण्यात यंत्रणेला यश येत असून जिल्ह्याचा मृत्युदर 3.8 असून दोन टक्यांआ पर्यंत तो खाली आणण्यात आला आहे. हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रशासन व्यापक प्रमाणात उपाय राबवत आहे. मृत्युदर रोखण्याला प्राधान्य देत मोठया प्रमाणात सर्वेक्षण आणि चाचण्यांद्वारे रुग्णांचे वेळेत निदान करणे, बाधितांचा दर कमी करणे आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढवणे या दृष्टीने प्रामुख्याने उपाययोजना राबवल्या जात आहे. सर्वेक्षण आणि चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने वेळेत रुग्णांना योग्य उपचार मिळणे शक्य झाले त्यासोबतच बाधितांमुळे वाढणारा संसर्गही नियंत्रणात आणणे शक्य होत आहे.ॲण्टीजेन चाचण्यांमुळे पावणे तीन हजार बाधीतांना शोधून काढता आले आहे. त्यामुळे आता गंभीर स्थितीतील रुग्णांचे प्रमाण मागच्या महिन्याच्या तुलनेत कमी झाले आहे. घाटीतील गंभीर स्थितीतील दाखल होणारे रुग्णांचे प्रमाण जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 60 च्या आसपास होते ते सध्या 20-25 रुग्णांवर झाले आहे.तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून ते 60-65 टक्क्यांपर्यंत सुधारले आहे. तसेच रुग्ण वाढीचे प्रमाण दुप्पट होण्याचे प्रमाण ही कमी होत आहे. बाधितांची टक्केवारी ही 25-26 वरुन 11.23 टक्यांंववर आली आहे. त्याचप्रमाणे घाटीतून गंभीर स्थितीतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ही खूप चांगले असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनूसार रुग्ण व्यवस्थापन, उपचार पध्दतीत आवश्यक बदल करण्यात येत आहे. संसर्ग रोखण्यासाठी ॲण्टीजेन टेस्ट उपयुक्त ठरत असून जिल्या सत 1 लाख 4 हजार टेस्ट करण्यात आल्या आहेत. तसेच वाळूज, शेंद्रा औद्योगिक परिसरातही येत्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात ॲण्टीजेन टेस्ट सुरु करण्यात येणार असून पहिल्या टप्यात सीआयआयने 20 हजार किटचा खर्च देण्याचे कबूल केले आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरीत सर्वांच्या चाचण्या करण्यात येणार आहे. शहरासोबत ग्रामीण भागातही ॲण्टीजेन चाचण्या मोठ्या प्रमाणात सुरु असून पूरेशा प्रमाणात या किट उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान खाजगी रुग्णालयाचे दर शासनाने निश्चित केले असून ठरवून दिलेल्या दराने उपचार करणे खाजगी रुग्णालयांना बंधनकारक आहे. त्याची अंमलबजावणी योग्य पध्दतीने होण्यासाठी त्या ठिकाणी प्रशासनामार्फत देयक तपासणीसाठी लेखापरिक्षकांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता, आपल्या आरोग्याची कटाक्षाने काळजी घ्यावी, कोणतेही दुखणे, आजाराची लक्षणे अंगावर काढू नये. तातडीने आपली तपासणी करुन घ्यावी जेणेकरुन आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोरोना संसर्ग यशस्वीपणे रोखण्यात यश येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. घाटीला औषध खरेदीसाठी निधी देण्यात आला असून रुग्णांना सर्व आवश्यक उपचार सुविधा देण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी कृतीशील आहे.
यावेळी मनपा आयुक्त श्री. पांडेय यांनी शहरातील कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी ॲण्टीजेन चाचण्यामुळे खूप सहाय्य मिळत असल्याचे सांगून व्यापारी वर्गांच्या ॲण्टीजन तपासणीत 9 जणांचे प्राण वाचवणे शक्य झाले असून 20 हजारपैकी 508 व्यापारी बाधित निघाले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगितले. तसेच शहराच्या सहा नाक्यांवर तसेच रेल्वेस्टेशनवर 24 तास तपासणी पथकाव्दारे ॲण्टीजन टेस्ट करण्यात येत आहे. त्यामध्ये आढळून आलेल्या 907 बाधीतांना आपण संसर्ग वाढवण्यापासून थांबवू शकलो तसेच त्यांना वेळेत उपचार मिळणे ही सहजतेने शक्य झाले आहे. तरी नागरिकांनी ॲण्टीजेन तपासणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करुन मनपातर्फे कोवीड केअर सेंटर, ताप तपासणी दवाखाने, एमएचएमएच ॲप, पालिकेच्या वॉर रुम, व इतर उपाययोजनांच्या उपक्रमाबाबतही श्री. पांडेय यांनी सविस्तर माहिती दिली.
यावेळी सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधींनी प्रशासनामार्फत कोरोना मुक्तीसाठी राबवण्यात येत असलेल्या उपाय योजनाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच संसर्ग रोखण्यासाठी लोकसहभाग वाढवण्याच्या दृष्टीने,इतर अनुषंगिंक उपाययोजना राबवण्यात सहकार्य करण्यासाठी सर्व पक्षांनी आपले स्वयंसेवक, कार्यकर्ते देण्याबाबत तयारी दर्शवली. तसेच संसर्ग रोखण्यासाठी मनपाने व्यापाऱ्यांची ॲण्टीजेन तपासणी मोहिम सुरु केल्याबद्दलही समाधान व्यक्त केले.
बैठकीस शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, कॉग्रेसचे डॉ कल्याण काळे, मोहम्मद हीशम उस्मानी , राष्ट्रवादी कॉगेसचे कैलास पाटिल, विजयराज साळवे, भाजपचे संजय केनेकर, आरपीआय आठवले गटाचे अरविंद अवसरमल, किशोर थोरात, बाळकृष्ण इंगळे, मनसेचे सुहास दाशरथे,सुमित खांबेकर, सतनामसिंह गुल्हाटी, प्रहार जनशक्तीचे प्रदिप त्रिभुवन, सुधाकर शिंदे ,यांच्यासह संबंधित उपस्थित होते.