AurangabadCrime Update : बिडकीन येथे एका प्रार्थनास्थळाजवळ जमलेल्या जमावाचा पोलिसांवर हल्ला , पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस जखमी

औरंगाबाद शहरात पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केलेल्या आवाहनानुसार आणि शहरात जारी केलेल्या आदेशानुसार शहरातील सर्व मुस्लिम बांधव लॉकडाऊन आणि कर्फ्यूचे, सामाजिक अंतराचे पालन करीत असताना ग्रामीण भागातील बिडकीन येथे आज अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त आहे. या विषयी पोलिसांनी सांगितले कि , लॉकडाऊनमध्ये एका प्रार्थनास्थळाजवळ जमा झालेल्या लोकांना हटकल्याच्या कारणावरून जमावाने पोलिसांवरच हल्ला केल्याची खळबळजनक घटना बिडकीनमध्ये घडली. यात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले असल्याचे वृत्त आहे.
बिडकीन पोलिसांना बिडकीन येथील औरंगाबाद-पैठण रोडवरील प्रकाश नगरमध्ये एका प्रार्थनास्थळावर जमाव जमल्याची माहिती बिडकीन पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी जाऊन विचारपूस करत असतानाच जमावाने त्यांच्यावर थेट हल्ला चढवत दगडफेक सुरू केली. यात पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील,सहायक फौजदार बाबासाहेब दिलवाले, पोलीस नाईक सोनवणे मेजर जखमी झाले आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात पोलिसांनी किती जणांना ताब्यात घेतले याविषयी अधिक माहिती मिळू शकली नाही.