गडकरींच्या सभेत विदर्भवाद्यांचा गोंधळ : चिडले गडकरी म्हणाले ” थप्पड लगावा आणि बाहेर काढा …

केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांवर चांगलेच भडकले. ‘ते जर पुन्हा गोंधळ घालणार असतील, तर त्यांना थप्पड लगावा… लक्षात ठेवा, आरडाओरड बंद करा नाहीतर थप्पड खाल आणि तुम्हाला बाहेर काढण्यात येईल. त्यांना बाहेर काढा’, अशा शब्दांत गडकरी यांनी आपला राग व्यक्त केला. नागपुरातील एका जाहीर सभेत गडकरी यांनी आपला राग व्यक्त केला. यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. नितीन गडकरी यांनी काल नागपुरात आयोजित जाहीर सभेत भाषण सुरू केल्यानंतर उपस्थितांपैकी विदर्भ समर्थक कार्यकर्त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. ‘स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे’, ‘जय विदर्भ’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. शिवाय उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिंधींच्या दिशेने पत्रकेही भिरकावली. हे पाहून गडकरी नाराज झाले. त्यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र कार्यकर्ते शांत होत नाहीत हे पाहून गडकरींना राग अनावर झाला. ते गोंधळ थांबवत नसतील तर त्यांना थप्पड लगावा आणि बाहेर काढा, असे गडकरी म्हणाले. मात्र, तरी देखील कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली.