औरंगाबाद शहरात होळी आणि रंगपंचमी उत्साहात

राज्यात सर्वत्र कोरोनाची दहशत असतानाही औरंगाबादकरांनी अत्यंत जल्लोषात होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यात आली. शहराची ग्रामदेवता असलेल्या राजा बाजार येथील श्री संस्थान गणपती मंदिरात आरती झाल्यानंतर मानाची होळीचे पूजन करण्यात आले आणि मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली. वाईट वृत्तींचा नाश होवो व नवीन पर्वाला सुरुवात होवो, असा आशीर्वाद यावेळी मागण्यात आला. अपप्रवृत्तीच्या नावाने यावेळी बोंब मारण्यात आली.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जग्गनाथ काळे, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अॅण्ड कॉमर्सचे अध्यक्ष प्रफुल्ल मालाणी, दयाराम बसैये, विजय जैस्वाल, रमेश घोडेले उपस्थित होते. मानाची होळी पाहण्यासाठी, पूजनासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकमेकांना रंग लावत होळी व धुळवडच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, शहर व परिसरात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने रांगोळी काढून आणि मुख्यत: पुरणपोळीचा नैवैद्य दाखत होळीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ‘होळी रे होळी पुरणाची पोळी…’ अशी घोषणाबाजी करत होळीचे दहन करण्यात आले. तर जयभवानीनगरात कोरड्या नाल्यात होळीचे दहन करण्यात आले. तर आज दिवसभरात सर्वत्र रंगपंचमी साजरी करण्यात आली.