बेपत्ता माय -लेकीचे मृतदेह विहीरीत आढळल्याने खळबळ , चौकशीच्या मागणीसाठी , नातेवाईकांचा दिवसभर घाटी रुग्णलयात ठिय्या…

औरंगाबाद जिल्ह्याच्या डोंगरगाव (ता. सिल्लोड) येथे गावालगत असलेल्या विहिरीत मायलेकीचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वंदना (वय ३०) आणि भारती (वय ७) अशी दोघींची नावे आहेत. त्या शनिवारपासून बेपत्ता होत्या. त्यांचे मृतदेह विहिरीत आढळून आल्यानंतर मयताच्या नातेवाईकांनी पोलिसांवरील आपला असंतोष व्यक्त करीत शवविच्छेदनासाठी दोघींचेही मृतदेह औरंगाबादच्या घाटी रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर तत्काळ अहवाल देण्याची मागणी नातेवाईकांनी केली होती त्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्राथमिक अहवालानुसार दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले परंतु त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा नातेवाईकांचा आरोप कायम होता. अखेर बेगमपुरा पोलीस आणि घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी या सर्व प्रकरणाचा तपास होईल अशी समजूत काढल्यानंतर त्यांचे मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतले.
या प्रकरणाची अधिक माहिती अशी कि , डोंगरगाव येथील वंदना व त्यांची मुलगी भारती या दोघी शनिवारपासून बेपत्ता होत्या. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांचे नातेवाईक या दोघींचा शोध घेत होते. या दरम्यान डोंगरगावतील दहिगाव रस्त्यालगत असलेल्या मुनाफ कारभारी या शेतकऱ्याच्या विहिरीत या मायलेकीचे मृतदेह गावातील एका नागरिकाने पाण्यावर तरंगताना सोमवारी सकाळी सातच्या सुमारास पाहिले . त्यांनी ही घटना गावात सांगितली आणि पोलिसांना माहिती दिली. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी येण्यास उशीर केला. मायलेकी बेपत्ता असल्याची तक्रार करूनही तपासात दिरंगाई केली, असा आरोप करून नातेवाईकांनी पोलिसांना धारेवर धरून संताप व्यक्त केला. रुग्णवाहिकेला फोन करूनही रुग्णवाहिका वेळेत न पोहचल्यामुळे नातेवाईकांनी गावापर्यंत मृतदेह आणला. यामुळे आरोग्य विभागाच्या कारभारावरही संताप व्यक्त केला. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात अद्यापपर्यंत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण बिडवे करीत आहेत.
दरम्यान या मायलेकीच्या मृत्यूच्या सखोल चौकशीसाठी नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन करून मृतदेहाचे शवविच्छेदन ‘इन कॅमेरा’ करण्याची मागणी केली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र बोकडे व ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किरण बिडवे यांनी मृतांच्या नातेवाइकांची समजूत काढून ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदनासाठी मायलेकीचा मृतदेह औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठविला होता . आज दिवसभराची हा तणाव कायम होता. शवविच्छेदनानंतर प्राथमिक अहवालानुसार या दोघीही मायलेकींचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले परंतु नातेवाईकांचे समाधान होत नव्हते अखेर अखेर बेगमपुरा पोलीस आणि घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी या सर्व प्रकरणाचा तपास होईल अशी समजूत काढल्यानंतर त्यांचे मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतले. प्राथमिक अहवालानुसार त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे कारण समोर आले असले तरी अंतिम अहवालानंतरच खरे कारण स्पष्ट होईल असे डॉक्टरांचे म्हणणे होते.