Aurangabad : पालकमंत्र्यांनी केली बीबी का मकबरा ते औरंगाबाद लेणी रस्त्याची पाहणी, नित्कृष्ट काम करणार्या कंत्राटदारावर कारवाईचे संकेत

औरंगाबाद : पालक मंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी (दि.२०) बीबी का मकबरा ते औरंगाबाद लेणी या रस्त्याची पाहणी केली. निकृष्ट दर्जाचे काम करणारे कंत्राटदारावर कारवाई करण्याचे संकेत पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यावर पालकमंत्र्यांनी बीबी का मकबरा ते औरंगाबाद लेणी रस्त्याची पाहणी केली.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीदरम्यान बीबी का मकबरा ते औरंगाबाद लेणी या रस्त्याचे काम २ कोटी रूपयांच्या निधीतून कंत्राटदाराने अत्यंत निकृष्ट केले असल्याचा मुद्दा समोर आला . पालकमंत्री देसाई यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यावर या रस्त्याची पाहणी केली . यावेळी त्यांच्यासोबत खासदार सय्यद इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, नगरसेवक सचिन खैरे, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री सुभाष देसाई हे रस्त्याची पाहणी करण्यासाठी आल्यावर स्थानिक रहिवासी तथा पत्रकार आदीत्य वाघमारे यांनी त्यांच्यापुढे रस्त्याचे काम कसे नित्कृष्ट झाले याचा पाढाच वाचला. त्यामुळे देसाई यांनी संबंधीत कामाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधीत विभागाला दिले.
देशी दारूच्या दुकानाचा मुद्दा चव्हाट्यावर
बीबी का मकबरा रोडवर असलेल्या देशी दारू दुकानाचा त्रास विदेशी पर्यटकांना होत असून हे दुकान अन्य ठिकाणी स्थलांतरीत करण्यात यावे अशी मागणी यावेळी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली.
मनपाचे अधिकारी फिरकलेच नाहीत
जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यावर पालकमंत्री देसाई यांनी बीबी का मकबरा ते औरंगाबाद लेणी या रस्त्याची पाहणी केली . या पाहणी दौरा दरम्यान मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांच्यासह संबंधित विभागाचे मनपाचे अधिकारी गैरहजर होते.