Aurangabad Crime : पन्नालालनगरात धाडसी घरफोडी, व्यापा-याचे घर फोडून १५ तोळे सोने, एक किलो चांदी चोरीला

शिवाई ट्रस्टच्या कार्यालयातून एलईडीसह प्रचार साहित्य लंपास
पोलिसांचा धाक संपुष्टात आल्याने चोरांचे आव्हान वाढले आहे. पोलिसांना हुलकावणी देत चोरांनी पन्नालालनगरातील व्यापा-याचे घर फोडून १५ तोळे सोन्याचे दागिने आणि एक किलो चांदीचे दागिने लंपास केले आहे. तर गजबजलेल्या औरंगपुरा भागातील शिवाई ट्रस्टचे कार्यालय फोडून एलईडी टिव्ही आणि प्रचाराचे साहित्य लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, व्यापा-याच्या घरात कपाटाखालच्या कप्प्यातील अडिच लाखांची रक्कम सुरक्षित राहीली. विशेष म्हणजे व्यापारी हे निवृत्त सहायक आयुक्तांचे सुपुत्र मुलगा आहेत.
उस्मानपुरा भागातील पन्नालालनगरमधील विद्या विकास बिल्डींग येथील लक्ष्मीकांत वज्रकुमार कटके यांचे वाळुज औद्योगिक वसाहतीत विद्या इंजिनियरींग नावाचे वर्कशॉप आहे. दिवंगत वज्रकुमार कटके हे सहायक पोलिस आयुक्त पदावरून निवृत्त झाले. त्यांचे सुपुत्र लक्ष्मीकांत हे दुमजली इमारतीत परिवारासह वरच्या मजल्यावर तर त्यांची आई खालच्या मजल्यावर राहते. सोमवारी लक्ष्मीकांत यांची आई वाळुज येथे राहत असलेल्या मुलाला भेटण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी वरच्या मजल्यावर लक्ष्मीकांत हे परिवारासह झोपलेले होते. रात्री एक ते सकाळी सहाच्या सुमारास चोरांनी खालच्या मजल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील १५ तोळ्याचे सोन्याचे दागिने व एक किलो चांदी लंपास केली. सकाळी साडेसहाच्या सुमारास लक्ष्मीकांत हे झोपेतून जागे झाल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप तारे, उपनिरीक्षक धणके यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. या धाडसी चोरीच्या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
………
अडिच लाखांची रक्कम बचावली…..
चोरांनी कपाटातील दागिने लंपास करताना कपाटाच्या खालच्या टप्प्यात अडिच लाखांची रोकड होती. चोरांनी दागिने नेले मात्र, पैशावर कपडे असल्याने ही रक्कम चोरांच्या हाती लागली नाही. दरम्यान, औरंगपुरा भागातील शिवाई ट्रस्ट तिसर्या मजल्यावरील कार्यालयाच्या खिडकीचे लोखंडी गज कापून चोरांनी एलईडी आणि प्रचाराची कागदपत्रे चोरुन नेली. याप्रकरणी डॉ. मोहन जोशी यांच्या तक्रारीवरुन क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.