पुण्यातील हेल्मेटसक्तीला स्थगिती नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुण्यात १ जानेवारीपासून लागू करण्यात आलेल्या हेल्मेटसक्तीला कोणत्याही प्रकारे स्थगिती न दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. नागपूर, मुंबई प्रमाणे पुण्यातही हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मात्र ही कारवाई रस्त्यावर न करता हेल्मेट न घालणाऱ्यांना चलान पाठवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत सीसीटीव्हीच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात येईल.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडाचे चलान आकारुन ऑफिस किंवा घरच्या पत्यावर पाठवण्यात येईल. रस्त्यावर कारवाई केली जाणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
यापूर्वी हेल्मेट सक्तीला विरोध करणाऱ्या आणि हेल्मेटसक्तीमुळे नाराज असणाऱ्या पुणेकरांची बाजू मांडण्यासाठी आमदार माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत हेल्मेटसक्तीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र स्थगितीची मागणी मान्य न करता हेल्मेटसक्तीमुळे दुचाकीस्वारांना रस्त्यावर होणारा त्रास कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चलनाचा पर्याय समोर आणला आहे.