सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत मोठी अपडेट; ‘या’ अटीवरच सोडणार उपोषण, संसद मोर्चाकडे सर्वांचे लक्ष
नवी दिल्ली: गेल्या २१ दिवसांपासून सुरू असलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. त्यांची पत्नी डॉ. गीतांजली जे. आंगमो यांनी रविवारी जंतर-मंतर येथील आंदोलनस्थळी स्पष्ट केले की, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी रुग्णालयात येऊन सोनम वांगचुक यांची भेट घ्यावी आणि संसद अधिवेशनात शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्वाचा मुद्दा प्राधान्याने उपस्थित करण्याचे आश्वासन दिल्यासच ते उपोषण सोडतील.
जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP) आयोजित आंदोलनादरम्यान पक्षाचे प्रमुख अभिजित दीपके यांच्या उपस्थितीत डॉ. गीतांजली यांनी ही भूमिका मांडली.
त्या म्हणाल्या, “आज अनेक राजकीय नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. मात्र सोनम यांची स्पष्ट भूमिका आहे की, उद्या खासदार आणि विविध पक्षांचे नेते सफदरजंग रुग्णालयात येऊन संसदेत शिक्षण आणि उत्तरदायित्वाचा मुद्दा ठामपणे मांडण्याचे आश्वासन देतील, तरच ते आपले उपोषण समाप्त करतील.”
संसद मोर्चाबाबतही भूमिका स्पष्ट
सीजेपीने सोमवारी संसदेकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली असून, जंतर-मंतर परिसरात समर्थकांची गर्दी वाढत आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या मोर्चासाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
डॉ. गीतांजली यांनी सांगितले की, दिल्ली उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यास नकार दिल्यामुळे त्या स्वतः त्यांच्या वतीने संसद मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यांनी समर्थकांना शांततेत आंदोलन करण्याचे आणि कायद्याचे पालन करण्याचे आवाहनही केले.
प्रकृती स्थिर, मात्र वैद्यकीय देखरेख सुरू
डॉ. गीतांजली यांच्या माहितीनुसार, सोनम वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न अद्याप यशस्वी झालेले नाहीत.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सायंकाळी जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये सांगितले की, सोनम वांगचुक यांचे महत्त्वाचे आरोग्य निर्देशांक (Vital Parameters) स्थिर असून रक्त तपासणीतील काही घटकांमध्ये सुधारणा दिसून आली आहे. तरीही त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने वैद्यकीय देखरेख ठेवण्याची गरज असल्याचे बुलेटिनमध्ये नमूद करण्यात आले आहे.
आंदोलनाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून पाठिंबा
रविवारी झालेल्या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांचे नेते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेते प्रकाश राज, आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.
महाराष्ट्रातही या आंदोलनाला पाठिंबा मिळत असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दादरच्या शिवाजी पार्क येथे आंदोलन आयोजित केले. या कार्यक्रमात आदित्य ठाकरे सहभागी झाले होते.
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आणि प्रस्तावित संसद मोर्चाचा पुढील निर्णय आता विरोधी पक्षांची भूमिका, दिल्ली पोलिसांची सुरक्षा व्यवस्था आणि संसदेतील घडामोडींवर अवलंबून असणार आहे.
