Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : दिल्ली इंडिया आघाडीने तर महाराष्ट्र शिवसेना ठाकरे गटाने गाजवला , उद्धव ठाकरे यांची सरकारवर टीका…

Spread the love

मुंबई: शिवसेना ठाकरे गटाने आज महाराष्ट्रात सर्वत्र महविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन करीत सरकारला घेरले. दरम्यान मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर आंदोलन केलं. सत्ताधारी पक्षातील विविध नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त कृत्यावरून आणि वक्तव्यावरून ठाकरे गटाने जोरदार घोषणाबाजी केली. अधिवेशनात रमी गेम खेळणारे माणिकराव कोकाटे, काळी जादू केल्याचा आरोप असणारे भरत गोगावले, हॉटेल रुममध्ये पैशांची बॅग घेऊन स्टे केल्याचा आरोप असलेले संजय शिरसाट अशा विविध नेत्यांवर ठाकरे गटाने कडाडून घोषणाबाजी आणि टीका केली.

या आंदोलनानंतर उद्धव ठाकरे यांनी महायुतीतील भ्रष्टाचारी नेते आणि मंत्र्यांवर जहरी टीका केला. यावेळी ठाकरेंनी फडणवीसांचा उल्लेख करत त्यांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी झाल्याचं म्हटलं. शिवाय आपल्याला त्यांची कीव येत असल्याचं देखील ठाकरे म्हणाले.

आंदोलनस्थळी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले, “मी तमाम शिवसैनिकांना सांगतोय. २०१४ साली ज्या प्रमाणे नरेंद्र मोदींनी ‘चाय पे चर्चा’ केली होती. तसं तुम्हीही करा. जिथे जाल, जिथे बसाल, तिथे भ्रष्टाचारविरोधी चर्चा करा. अगदी चहा प्यायला टपरीवर जा. केस कापायला सलूनमध्ये बसा. सावली बार सोडून कुठेही बसा. पण आता महाराष्ट्रात भ्रष्टाचार पे चर्चा करायची. जोपर्यंत भ्रष्टाचारी मंत्री काढले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही,” अशी घोषणाही ठाकरेंनी केली.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांची मला कीव येते. त्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे. वरती तिकडे दिल्लीत त्यांचे बापजादे बसलेत. तरी सुद्धा त्यांची हिंमत होत नाही, भ्रष्टाचाऱ्यांना काढण्याची. काही वेळासाठी असं समजू की स्वत: देवेंद्र फडणवीसांनी भ्रष्टाचार केला नाही. मग ते एवढी बदनामी का ओढावून घेतायत. तुम्ही (देवेंद्र फडणवीस) त्यांच्या चुकांवर पांघरून का टाकताय? तुमच्याकडे बहुमत असून, जगातला सगळ्यात मोठा पक्ष, भाजपा अर्थात भ्रष्टाचारी जनता पक्ष तुमच्याकडे आहे. तरीही तुम्हाला कारवाई करता येत नाही.

भाजपकडे जसं अध्यक्ष करायला माणूस नाही. तसं हे भ्रष्ट मंत्री काढून दुसरे घ्यायला तुमच्याकडे (फडणवीस) लोक नाहीत का? तुमच्यावर कुणाचा दबाब आहे? हा भ्रष्टाचार त्यांना पटतोय का? हे देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावं. नाहीतर त्यांनी सांगावं, भ्रष्टाचारी लोकांना मला काढायचं आहे, पण माझं असं झालंय की सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही,” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीकास्र सोडलं.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!