Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathaResevation : मराठा समाजाचा झंझावात मुंबईच्या दिशेने, जालना पोलिसांची सशर्त परवानगी…

Spread the love

जालना: मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरंगे यांच्या नेतृत्वाखाली हजारोंचा जनसमुदाय शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह आज मुंबईच्या दिशेने रवाना झाला. दरम्यान अंतरवालीतून निघण्यापूर्वीच पोलिसांनी ५० अटींचे पत्र जरंगे यांच्या हातात दिले. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मराठ्यांच्या वादळाचा पहिला मुक्काम हा शिवनेरीवर असणार आहे.

मराठा आरक्षणाच्या हक्कासाठी आता थांबायचं नसून शांततेत मुंबईच्या दिशेने जायचं असल्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. सरकारकडून जाणीवपूर्वक आपल्या मुंबई मोर्चाची अडवणूक असल्याचा आरोपही जरांगे यांनी अंतरवालीतून केला.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर निर्णायक आंदोलनाची घोषणा केल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याआधी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा समाज बांधवांना संबोधित केले. जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांना आवाहन करताना म्हटले की, कोणीही कितीही डिवचलं तरी शांत राहायचं, कोणीही दगडफेक, हिंसाचाराच्या मार्गाचा अवलंब करायचा नसल्याचे त्यांनी म्हटले.

मुंबई मोर्चासाठी, सोमवारी रात्रीपासून अंतरवाली सराटी येथे मराठा बांधवांनी रात्रीपासूनच मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. हायकोर्टाने जरांगे यांना मुंबई मोर्चावरून खडसावल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी उशिरा रात्री पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. कोर्टाच्या सूचनांची प्रत खांबे यांनी जरांगेंना दिली आहे. दरम्यान कोर्टाच्या निर्णयाचा आदर करून मुंबईकडे निघू नका, अशी विनंती पोलिसांनी केली आहे. मात्र, जरांगे आपल्या निर्णयावर राहिले.

जालना पोलिसांकडून मनोज जरांगेंना कोणत्या अटी?

मुंबईतील आंदोलनासाठी निघालेल्या मनोज जरांगे यांना जालना पोलिसांनी जरांगे यांना अटी शर्तींसह जालन्यातून बाहेर पडण्यास मंजुरी दिली.
मुंबईच्या दिशेने होणार्‍या प्रवासा दरम्यान आक्षेपार्ह घोषणा तसेच जातीय तेढ निर्माण करणारी विधाने होणार नाही. याची दक्षता घेण्यास पोलिसांनी सांगितले आहे.
प्रवासाचा मार्ग हा घोषीत केल्या प्रमाणेच राहील व नंतर बदलणार नाही याची दक्षता घ्यावी
सदर प्रवासादरम्यान अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या अॅम्ब्युलन्स, फायरब्रिगेड आदीसह इतर वाहतुक / रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी मराठा मोर्चेकऱ्यांना घ्यावी लागणार आहे.
प्रवासा दरम्यान खाजगी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई करण्याची जबाबदारी आयोजक आणि आंदोलनकर्ते यांची राहील ही बाबही पोलिसांनी नमूद केली आहे.
सदर प्रवासामध्ये सहभागी होणारे नागरिक हे आपल्या हातामध्ये कोणत्याही प्रकारचे घातक शस्त्र, लाठी, काठी, तलवार, लोखंडी गज, दगड किंवा ज्वलनशील पदार्थ बाळगणार नाहीत याची दक्षता घेण्याची सूचना पोलिसांनी आयोजकांना केली आहे.
यासह इतरही महत्त्वाच्या सूचना आणि अटी पोलिसांनी घातल्या आहेत.

मनोज जरंगे यांचा सरकारवर हल्ला बोल

मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल करताना आरोप केला  की, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी त्यांना आरक्षणाचे  काम करू दिले  नाही, त्यानंतर आज माध्यमांच्या प्रश्वावरती उत्तर देताना एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षणावर बोलू देत नाहीत असा मोठा दावा मनोज जरांगे पाटलांनी केला आहे.

मी घेतलेल्या निर्णयावर ठाम आहे, मी मुंबईकडे निघालो आहे, देवदेवाच्या आड लपायचं आणि हिंदू लोकांच्या आड लपायचं, याच्याबाबत कोण बोलत नाही, पण त्यांनी आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही त्यांना जन्मभर विसरणार नाही, नाही सहकार्य केलं तर कमीत कमी तो समाजासमोर उघडा पडेल. त्यांचे नेते एकजुटीने लढत आहेत. आता यांनाच काय झालंय, आता आम्हाला गरज आहे. राजकीय पक्षातील मराठे, सत्ताधारी, विरोधक आणि श्रीमंत मराठे यांची आम्हाला गरज आहे, असंही जरांगेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

….त्यांना बोलू दिलं जात नाही

जरांगे सातत्याने म्हणत आहेत, देवेंद्र फडणवीस त्यांना थांबवत आहेत, त्यामुळे ते बोलत नाहीत का? यावर जरांगे म्हणाले, किती दिवस सगळं सहन करतील, सत्ताधारी आणि विरोधातील मराठा आमदारांना आवाहन केलं आहे, तुम्ही आम्हाला साथ द्या, आज समाजाला तुमची गरज आहे, समाज तुमच्या सोबत आहे, तुम्ही समाजासोबत राहा, कशालाही घाबरू नका सोबत या साथ द्या, असंही जरांगेंनी सत्तेतील आणि विरोधातील नेत्यांना, आमदारांना आवाहन केलं आहे, दरम्यान पत्रकाराच्या एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली होती, तेही आता मराठा आरक्षावरती बोलत नाहीत या प्रश्नावर उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले, “त्यांना बोलू दिलं जात नाही”.

सरकारी शिष्टमंडळ भेट घेणार

दरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. ते जरांगेंचे मन वळवण्याचा प्रयत्न करणार आहे. या शिष्टमंडळात मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य सुद्धा असतील. ही समिती सरकारने स्थापन केलेली आहे. यापूर्वी समितीचे अध्यक्षपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे होते. आता राधाकृष्ण विखे पाटील हे अध्यक्ष आहेत. हे शिष्टमंडळ सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती जरांगे पाटील यांना देण्याची शक्यता आहे. तर सरकार मोठी घोषणा करण्याची पण शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर न्यायमूर्ती शिंदे समितीला अजून 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

बंद दाराआड चर्चा नाही

मनोज जरांगे पाटील यांनी शिष्टमंडळ भेटीला येणार असल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपण सरकारी बोलायला काल पण तयार होतो आजपण बोलायला तयार असल्याचे ते म्हणाले. सरकारशी चर्चा करायची तयारी त्यांनी दाखवली. पण चर्चा ही बंद दाराआड होणार नाही. ही चर्चा सर्वांसमोर होईल असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. त्यावर आता सरकार काय भूमिका घेते हे लवकरच समोर येईल.

तर दुसरीकडे मुंबईत मोर्चाला परवानगी देण्याची हालचाल पण सुरू आहे. मनोज जरांगे यांच्यासह 5 हजार जणांना एका ठराविक काळासाठी आझाद मैदानावर अटी आणि शर्तींवर परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार मोर्चा मुंबईत येऊन नये यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्व प्रयत्न करत असल्याचे समोर येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!