AccidentNewsUpdate : गेल्या २४ तासात झालेल्या विविध अपघातात ११ ठार
भोपाळ : गेल्या २४ तासात झालेल्या विविध अपघातात ११ ठार झाल्याचे वृत्त आहे. यापैकी मध्य प्रदेशातील अनूपपूर येथे भीषण अपघात घडला आहे. येथे एक जीप आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेली एक जीप एका दुचाकीला धडकली. यानंतर, ती अनियंत्रित होऊन एका घरात घुसली. या भीषण अपघातात एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना एका सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संबंधित जीपमधून काही लोक जरिया टोला येथून बेलिया छोटकडे जात होते. दरम्यान, समोरून येणाऱ्या दुचाकीला जीप धडकली. या अपघातात दोन दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर, जीप अनियंत्रित होऊन जवळच्याच एका घराला जाऊन धडकली. या धडकेत जीपमधील तीन जणांच जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. याशिवाय पोलीस जवळपासच्या लोकांकडून घटनेची माहितीही एकत्र करत आहेत.
दुसऱ्या अपघातात ३ ठार , ३० जखमी
पुणे : श्रीक्षेत्र कुंडेश्वर येथील भगवान महादेवाच्या दर्शनासाठी महिला भाविकांना घेऊन जाणाऱ्या पिकअप अपघात होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. पिकअपमधील २८ ते ३० महिला जखमी झाल्या आहेत. त्यापैकी आठ ते दहा महिला गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेने तातडीने हलवण्यात आले आहे. या अपघातात ती महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
पाईट ता खेड परिसरातील श्रीक्षेत्र कुंडेश्वर येथे देवदर्शनासाठी चाललेल्या महिलांचा पिकअप गाडी हीकुंडेश्वर डोंगराच्या पहिल्या वळणावर घाट चढत होती. पिकअप पुढे न गेल्याने पाठीमागे येऊन सुमारे शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये असलेल्या २८ ते ३० महिला जखमी झाल्या आहेत. गाडीमध्ये अक्षरशा रक्ताचा खच साचला होता. असून त्यातील आठ ते दहा महिला अत्यावस्थ असून त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने हलविण्यात आले आहे. या अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला आहे.
रक्षाबंधनासाठी बहिणीला भेटायला भाऊ बसच्या चाकाखाली, जागीच मृत्यू
जालना : रक्षाबंधनाला बहिणीच्या भेटीसाठी निघालेल्या भावाचा अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जालना जिल्ह्यात बदनापूरमध्ये घडली आहे. संजय सुदामराव चंदनपाट असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
करमाड जवळील जडगाव येथील संजय सुदामराव चंदनपाट (वय वर्ष ४८) हे दुचाकीने जालन्याच्या दिशेने जात होते. मात्र त्यांचा वाहनावरचा ताबा सुटून शाळेच्या बस क्रमांक एमएच १४ एमएच १६७९ च्या मागील चाकाखाली ते सापडले. जालना ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बदनापूरमध्ये ही घटना घडलीये. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. भावाच्या मृत्यूची बातमी कळताच बहिणीने हंबरडा फोडला. आता भावाला पुन्हा कधीच राखी बांधता येणार नाही, या वास्तवाने बहीण हमसून हमसून रडली. चंदनपाट आणि बहिणीच्या कुटुंबियांच्या घरी संजय यांच्या मृत्यूमुळे सणादिवशी स्मशान शांतता होती.
पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविक जागीच ठार
परभणी : पाथरी-सेलू मार्गावर खेडूळा पाटीजवळ आज, सोमवारी ( दि. ११ ) पहाटे भरधाव कार कावड यात्रेत घसून झालेल्या भीषण अपघातात दोन भाविक जागीच ठार झाले, तर दोन गंभीर जखमी झाले. ऋषिकेश अशोक शिंदे (रा. सेलू) आणि एकनाथ गंगाधरराव गजमल (रा. डासाळा, ता. सेलू) अशी मृत भाविकांची नावे आहेत. श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर कोसळल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
श्रावण सोमवार निमित्त सेलूहून पाथरी तालुक्यातील रत्नेश्वर रामपुरी येथे आलेल्या कावड यात्रेतील सुमारे २५० भाविक परतीच्या मार्गावर असताना पहाटे अंदाजे ५ वाजता कारने थेट यात्रेत घुसून हा अपघात घडला. या दुर्घटनेत ऋषिकेश अशोक शिंदे (रा. सेलू) आणि एकनाथ गंगाधरराव गजमल (रा. डासाळा, ता. सेलू) हे जागीच ठार झाले. तर दोन गंभीर जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पाथरी पोलिस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके , जैस्वाल, थोरे आणि इतर कर्मचारी तातडीने 5.20 वाजता घटनास्थळी धाव घेतली व पुढील तपास सुरू आहे.
श्रावण महिन्याचे औचित्य साधून संकल्प अखंड हिंदू राष्ट्र समितीच्यावतीने आज सकाळी सेलू येथील रेल्वे गेटपासून कावड यात्रेला सुरुवात होणार होती. यासाठी सेलू शहरात मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली होती. विविध भागात फलक, बॅनर लावून वातावरण निर्मिती करण्यात आली होती. सेलू शहरासह तालुक्यातील शेकडो तरुण यात सहभागी झाले होते. रेल्वे गेटवरून सुरू झालेली ही यात्रा शंकर लिंग मंदिर, सुरज मोड येथे मिरवणुकीनंतर समाप्त होणार होती. मात्र, कावड यात्रा सेलू येथे पोहचण्यापूर्वी पाथरीतील अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण सेलू शहरात शोककळा पसरली आहे.
