Success Story Update : अनंत आर्थिक अडचणींवर मात करीत सफीन हसन झाला अवघ्या २२ व्या वर्षी आयपीएस परीक्षेत सफल !!
नवी दिल्ली : गुणवत्ता आणि ज्ञानाला कोणत्याही अडचणी थांबवू शकत नाही अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर घडतात . असाच एक जिद्दीचा इतिहास सफीन हसन या तरुणाने रचून सर्व अडचणींवर यस्वीरित्या मात केली आहे . गुजरातमधील एका मजूर कुटुंबातील सफीन भारतातील सर्वात तरुण आयपीएस अधिकारी झाले आहेत.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सफीन हसन यांचा जन्म १९९५ मध्ये गुजरातमधील पालनपूर येथे झाला. रिपोर्टनुसार, सफीन यांचे पालक हिरे उद्योगात काम करायचे, परंतु २००० मध्ये दोघांनाही नोकरी गमवावी लागली. त्यानंतर, त्याची आई इतरांच्या घरी जेवण बनवू लागली आणि वडील विटा वाहून कुटुंबाचं पोट भरत असत.
कठीण परिस्थितीतही सफिन यांचं स्वप्न खूप मोठं होतं. जेव्हा एक कलेक्टर त्याच्या शाळेत आले तेव्हा त्याच्या डोक्यात आयएएस होण्याचा विचार आला. काही तरी वेगळं करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. शाळेने त्यांची अकरावी आणि बारावीची फी माफ केली. नातेवाईकांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी पाठिंबा दिला आणि सफीन यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
धक्कादायक बाब म्हणजे २०१७ मध्ये यूपीएससी परीक्षा देण्यासाठी जात असताना, त्यांचा मोठा अपघात झाला. सफीन यांनी जखमी अवस्थेत परीक्षा दिली, त्यानंतर रुग्णालयात अनेक शस्त्रक्रिया आणि फिजिओथेरपी करण्यात आली. पण ते हारले नाहीत. शेवटी त्यांना कठोर परिश्रमाचं फळ मिळालं. सफीन यांनी यूपीएससी परीक्षेत ऑल इंडिया ५७० रँक मिळवला आणि वयाच्या २२ व्या वर्षी आयपीएस झाले. आज सफीन हसन लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत.
