Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CrimeNewsUpdate : स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपीला पकडण्यासाठी १ लाखाचे बक्षीस….

Spread the love

पुणे :  पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना बुधवारी सकाळी उजेडात आली. या प्रकारानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी संताप व्यक्त केला असून पोलिसांनीही आरोपीच्या शोधासाठी १३ पथके तैनात केली आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार होता, त्याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल असून तो सध्या जामिनावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचा शोध घेण्याकरता पुणे पोलिसांनी १ लाखांचंही बक्षिस जाहीर केलं असून त्याच्या कुटुंबियांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणात स्वारगेट स्थानकात तैनात असलेल्या २३ सुरक्षा रक्षकांचं निलंबन करण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांना तपासाचा वेग वाढवला असून आरोपीला शोधण्याकरता ड्रोनचा वापर केला जात आहे.

विजया रहाटकर यांचे पत्र

स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय महिला आयोगाकडून (एनसीडब्ल्यू) घेण्यात आली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पत्र पाठविले आहे. पुणे पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील तपास अहवाल, फिर्यादीची प्रत तीन दिवसात राष्ट्रीय महिला आयोगाकडे सादर करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या प्रकरणात लक्ष घालून आहेत. मी ही पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो असून या प्रकरणी कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. तत्काळ आरोपीला अटक होईल, त्याचे लागबांधे पोलिसांच्या हाती आले आहेत. लाडक्या बहि‍णींना एसटीतून प्रवास करता यावा, म्हणून ५० टक्के सवलत दिली. पण असे नराधम अत्याचार करणार असतील तर त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, याकरता सरकार प्रयत्न करेल. कोणीही कोणत्याही पक्षाचा असूद्या, कोणाशीही संबंधित असूद्या, अशा गुन्हेगारांची गय केली जाणार नाही – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

गृहराज्यमंत्री योगेश कदम काय म्हणाले ?

पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोत झालेल्या तरुणीवरील अत्याचाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. जवळपास 26 तासांनी हा गु्न्हा उघडकीस आला. त्यानंतर पुण्यासह राज्यभरात एकच खळबळ उडाली. आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. स्वारगेट एसटी डेपोत उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून तपास पथके रवाना करण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट एसटी डेपोतील घटनास्थळाला भेट दिली.

स्वारगेटमधील या घटनेनंतर जनतेतून संताप व्यक्त होत असताना दुसरीकडे आज गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट एसटी डेपोतील घटनास्थळाला भेट दिली. घटनास्थळाला भेट दिल्यानंतर योगेश कदम यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत भेट घेत तपासाची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवर भाष्य केले.

दिवस-रात्र प्रवाशांचा राबता असलेल्या स्वारगेट एसटी स्टँडवर गुरुवारी एका 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली. या प्रकरणाने राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. मागील 48 तासांपासून आरोपी मोकाट आहे. स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे विरोधा या अगोदरच जबरी चोरीचे गुन्हे हे शिरूर आणि शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये असल्याने त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे.दत्ता गाडे नावाच्या फरार आरोपीचा शोध शिरूर आणि पुणे पोलीस करीत आहेत.

 पोलीस अधिकाऱ्यांची केली पाठराखण ….

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. एसटी महामंडळाच्यावतीने खासगी सुरक्षा रक्षक नेमले जातात. पोलिसांकडून नियमितपणे गस्त घालण्यात येते. घटनेच्या दिवशीदेखील गस्त घालण्यात आली होती. पोलिसांनी गस्त घातली, कुठलंही दुर्लक्ष पोलिसांनी केले नसल्याचे त्यांनी सांगितले. आरोपी सावध होऊ नये यासाठी पोलिसांकडून या प्रकरणी गुप्तता पाळण्यात आली असल्याचे सांगत त्यांनी प्रकरण लपवण्याच्या आरोपावर पोलीस अधिकाऱ्यांची पाठराखण केली.

योगेश कदम यांनी सांगितले की, ही घटना घडली त्यावेळी शिवशाही बसच्या आजुबाजूला 10 ते 15 लोक होते. पण तरुणीने विरोध न केल्याने कोणालाही शंका आली नाही. तरुणीकडून आक्रमक कृती झाली असती तर कदाचित ही घटना घडली नसती. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या चौकशीत अनेक गोष्टी समोर येतील असेही योगेश कदम यांनी नमूद केले.

माझा दत्तात्रय गाडेशी काहीही संबंध नाही : आमदार ज्ञानेश्वर कटके

दरम्यान पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचे राजकीय नेत्यांशी संबंध असल्याची चर्चा आहे. तो मुळचा शिरूरचा राहणारा असल्याने शिरूरच्या आजी-माजी आमदारांबरोबर त्याचे फोटो असल्याचे समोर आले आहे. शिरूरचे आजी माजी आमदार अनुक्रमे अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आहेत. पण माझा दत्तात्रय गाडेशी काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया शिरूरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी दिली आहे.

शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर दत्तात्रय गाडे याचा फोटो आहे. अशोक पवार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातील आहेत. तर, शिरूरचे विद्यमान आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याबरोबरही दत्तात्रय गाडेचा फोटो असून तो त्याने त्याच्या डीपीला लावला असल्याचं म्हटलं जातंय. याप्रकरणी ज्ञानेश्वर कटकेंनी आता प्रतिक्रिया दिली आहे.

“आरोपी शिरूर तालुक्यात राहणारा आहे. तो मतदारसंघ माझा असल्याने अनेकजण येतात आणि माझ्याबरोबर फोटो काढतात. पण माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. दिवसभरात असे अनेकजण भेटत असतात, फोटो काढत असतात. पण मी दत्तात्रय गाडेला ओळखत नाही. विकृत असलेल्या अशा लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.”

माजी आमदार अशोक पवार काय म्हणाले?

“हा आरोपी उज्जैन यात्रेला कोणाला मदत करत होता, कोणत्या महिला-भगिनींना नेत होता, याची सखोल चौकशी पोलीस खात्याने केली पाहिजे. याचे हितसंबंध कोणा-कोणाशी होते, हे ताबडतोब शोधलं पाहिजे. याचा मोबाईल ताब्यात घेणं किंवा उज्जेनला गेला त्याचे रेकॉर्ड मागा. अशा आरोपीला फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे”, असं राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी आमदार अशोक पवार म्हणाले.

दरम्यान, या राजकीय हितसंबंधांची चौकशी पोलिसांकडून करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!