IndiaNewsUpdate : धक्कादायक : राम जानकी मंदिरातून 30 कोटी रुपयांच्या मूर्त्यांची चोरी , पुजाऱ्यास अटक

लखनौ : उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक राम जानकी मंदिरातून 30 कोटी रुपयांच्या अष्टधातूच्या मूर्ती चोरी झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. मंदिराच्या पुजाऱ्याने समाजवादी पक्षातील नेत्याच्या मदतीने मूर्ती चोरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुजारी आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यासह एकूण चार आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 14 जानेवारी रोजी पडरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राम जानकी मंदिरातून देवाच्या प्राचीन अष्टधातूच्या मूर्ती चोरीला गेल्या होत्या. या संदर्भात मंदिराचे पुजारी वंशीदास यांनी पदरी पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला होता. मूर्ती चोरीच्या तपासादरम्यान संशयाची सुई मंदिराच्या पुजाऱ्यावर फिरली, त्यामुळे त्याचीही चौकशी करण्यात आली. चौकशीअंती धक्कादायक माहिती समोर आली. मंदिराच्या पुजाऱ्यानेच मूर्ती चोरल्याचे तपासात उघड झाले.
वंशीदास गुरू, असे पुजाऱ्याचे नाव असून, स्वत:चा वेगळा मठ बांधण्यासाठी त्याने साथीदारांच्या मदतीने मंदिरातून मूर्ती चोरल्याची कबुली दिली. पोलिस चौकशीत पुजाऱ्याने सांगितले की, महाराज जयराम दास आणि सतुआ बाबा यांच्यात मंदिराच्या मालकी हक्कावरून वाद सुरू होता. वाद संपल्यानंतर जयराम दास यांनी मला मालमत्ता आणि गादी देण्याचे आश्वासन दिले होते. पण, नंतर त्यांनी आपला शब्द फिरवला अन् माझ्याऐवजी आपल्या पुतण्याला संपत्ती आणि गादी देण्याचे ठरवले.
यावर वंशीदास गुरुने प्रयागराजमधील समाजवादी पक्षाच्या मुलायम सिंह युवा ब्रिगेडचे राष्ट्रीय सचिव राम बहादूर पाल आणि त्याच्या साथीदारांना बोलावून मूर्ती दाखवल्या. या मूर्ती अष्टधातूच्या असल्याचे लक्षात येताच पुजारी व त्याच्या साथीदारांनी त्या मंदिरातून चोरून हैमाई टेकडी मंदिरात लपवून ठेवल्या. पण, अखेर पोलिसांना याचा सुगावा लागला आणि त्यांनी आरोपींना रंगेहात पकडले.
याप्रकरणी अतिरिक्त पोलिस अधीक्षक ओपी सिंह यांनी सांगितले की, 14 जानेवारी रोजी राम जानकी मंदिरातून मूर्ती चोरीला गेल्याची बाब समोर आली होती. या अष्टधातूच्या मूर्तीची किंमत सुमारे तीस कोटी रुपये आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली असून, पुढील कारवाई सुरू आहे.