Parliament News Update : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे, याबाबत लोकसभा सचिवालयाने माहिती दिली आहे. हे अधिवेशन ४ एप्रिल रोजी संपण्याची शक्यता आहे. दरम्यान, या वर्षी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण त्यांचे सलग आठवे बजेट सादर करतील. १ फेब्रुवारी रोजी संसदेच्या अधिवेशनात अर्थमंत्री सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. परंपरेनुसार, अधिवेशनाची सुरुवात ३१ जानेवारी रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीने होईल, या बैठकीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संबोधित करतील.
संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनानंतर आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाईल. लोकसभा सचिवालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर दोन्ही सभागृहात चर्चा होते.
अठराव्या लोकसभेचे हे चौथे अधिवेशन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल. १८ व्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. यापूर्वी गेल्या वर्षी झालेल्या हिवाळी अधिवेशनात बराच गोंधळ झाला होता.
हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०२४ पर्यंत चालेल. २६ दिवस चाललेल्या या अधिवेशनात लोकसभेच्या २० आणि राज्यसभेच्या १९ बैठका झाल्या. अधिवेशनादरम्यान लोकसभेत ५ विधेयक सादर करण्यात आली. लोकसभेने ४ विधेयके मंजूर केली. तर राज्यसभेने ३ विधेयके मंजूर केली. एकंदरीत, हिवाळी अधिवेशन विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात गोंधळाने भरलेले होते आणि सभागृहाचे कामकाज तहकूब होत राहिले.