IndiaNewsUpdate : विजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर १२ कट्टर नक्षलवाद्यांचा खातमा….

( प्रतीकात्मक छायाचित्र )
नवी दिल्ली : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात २०२५ च्या सुरुवातीलाच मोठी कारवाई करण्यात आली आहे. तेलंगणा राज्य आणि बस्तरमधील देशातील एकमेव नक्षल बटालियन नंबर वनचा तळ असलेल्या विजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर गुरुवारी झालेल्या चकमकीत १२ कट्टर नक्षलवाद्यांचा खातमा करण्यात आला.
या चकमकीत सेंट्रल रीजनल कमिटी कंपनी नंबर-२ चे नक्षलवादीही मारले गेल्याचे सांगण्यात येत आहे. सुरक्षा दलांना एका आठवड्यापासून नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळत होती. यानंतर, १४ जानेवारी रोजी सुकमा, दंतेवाडा, विजापूर येथून जवानांना ऑपरेशनवर पाठवण्यात आले. जवान चकमकीच्या ठिकाणाजवळील छावण्यांवर पोहोचले आणि बुधवारी रात्री त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून एकाच वेळी कारवाई केली आणि नक्षलवाद्यांना घेरले. चकमक संपल्यानंतरही, जवानांनी रात्र जंगलात घालवली आणि २४ तास संपूर्ण परिसराला वेढा घातला.
चकमकीनंतर जवानांनी दिलेल्या माहितीनुसार , नक्षलवाद्यांनी त्यांच्या छावणीत एक बोगदा खोदला होता आणि तिथे शस्त्रास्त्र कारखाना बांधला होता. बोगद्याखाली मोठ्या प्रमाणात पाईप, स्फोटके, लेथ मशीन आणि इतर उपकरणे ठेवण्यात आली होती, तिथे ते शस्त्रे बनवत असत. चकमकीदरम्यान, त्याच शस्त्रास्त्र कारखान्यात बनवलेला रॉकेट लाँचर देखील जप्त करण्यात आला. नक्षलवाद्यांचा हा कारखाना आणि उपकरणेही जवानांनी उद्ध्वस्त केली आहेत.
बिजापूरच्या वॉर रूममध्ये बस्तरचे आयजीपी सुंदरराज पी., बिजापूरचे एसपी जितेंद्र यादव, दंतेवाडाचे एसपी गौरव रामप्रवेश राय आणि सुकमाचे एसपी किरण चव्हाण यांच्या उपस्थितीत, दिवसभर ऑपरेशनसाठी संयुक्त रणनीती तयार केल्यानंतर, जवानांना दोन दिवसांचा रेशन देण्यात आला.