LadkiBahinNewsUpdate : लाडक्या बहीणींसाठी खुशखबर ! डिसेंबरचा हप्ता आजपासून खात्यात पैसे जमा होणार

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. डिसेंबर महिन्याच्या हप्ता कधी जमा होणार या चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहेत. डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसापूर्वीच अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हप्ता लवकरच वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती.
विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कमेत वाढ करुन २१०० रुपये करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. दरम्यान, आता सहावा हप्ता २१०० रुपये येणार की १५०० रुपये येणार या चर्चा सुरू होत्या. दरम्यान, आता सहावा हप्ता हा १५०० रुपये प्रमाणेच येणार असल्याचे सांगितले जात आहे. जुलै ते नोव्हेंबरपर्यंत १५०० रुपयांप्रमाणे ७५०० रुपये महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते. आता आजपासून डिसेंबर महिन्याचा हप्ता वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नागपुरातील अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महिन्याचा हप्ता १५०० रुपयांप्रमाणेच जमा होणार असल्याची माहिती दिली होती. डिसेंबरचा हप्ता आजपासून वर्ग करण्यात येणार आहे. एका महिन्यासाठी लागणारी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. या महिन्यात दोन टप्प्यात महिलांना पैसे मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात २ कोटी ३५ लाख महिलांना १५०० रुपयांप्रमाणे जमा होणार आहेत. तर निवडणुकीआधी आलेल्या २५ लाख नवीन अर्जाची स्क्रुटिनी सुरू आहे, ती पूर्ण झाल्यानंतर या महिलांना हप्ता जमा होणार आहे.
आधीच्या मंजूर अर्जाची चौकशी नाही ….
विधानसभा निवडणुकीच्या काळात याच योजनेला केंद्रस्थानी ठेवून महायुतीने आपला प्रचार केला होता. मात्र आता या योजनेतील लाभार्थी महिलांच्या तक्रार आलेल्या अर्जांची छाननी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या वृत्तानंतर राजकीय वर्तुळातून तसेच राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. असे असतानाच आता नवी आणि ठोस माहिती समोर आली आहे. लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी पुन्हा होणार नाही, असे राज्याच्या माजी महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
आदिती तटकरे यांनी म्हटले आहे की, “लाडकी बहीण योजने जवळपास दोन कोटी 34 लाखाच्या जवळपास महिला लाभार्थी आहेत. लाभार्थ्यांची कोणत्याही प्रकारची स्क्रुटनी होणार नाही. छाननीबाबत चुकीचे वृत्त समोर येत आहे. या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना योग्य पद्धतीने लाभ मिळालेला आहे. या योजनेच्या काही लाभार्थी महिलांच्या अर्जांबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींबाबतसंबंधित विभाग निर्णय घेईल. पण सध्यातरी अर्जांच्या छाननीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. सध्या मी त्या विभागाची मंत्री नाही. मात्र मी जेव्हा मंत्री होते, त्यावेळी असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. जे लाभार्थी आहेत, त्यांना योग्य पद्धतीने पैसे देताना याआधीच अर्जांची छाननी करण्यात आलेली आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अर्जांची छाननी करण्याचे सूतोवाच केले होते. तसेच या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ 1500 रुपयांवरून 2100 रुपये केला जाईल, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली होती. सर्व बाबी तपासून आगामी अर्थसंकल्पात त्यासाठीच्या निधीची तरतूद करण्यावर विचार केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले होते.