उद्धव ठाकरेंची मशाल क्रांतीची नसून घराघरात आग लावणारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबाेल
मुंबई : उद्धव ठाकरे यांची मशाल क्रांतीची नसून घराघरात आग लावणारी असल्याची टीका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. धनुष्यबाण आमचा आहे, म्हणणाऱ्यांनी मशालही देऊन टाकल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. परंडा येथील जनतेच्या मनात काय आहे, हे गर्दीने ठरवले आहे. 23 तारखेला एकनाथ शिंदे फटाके फोडायला येताेय असेही मुख्यमंत्री म्हणाले. परांडा विधानसभेचे उमेदवार तानाजी सावंत यांच्या प्रचारासाठी आयाेजीत करण्यात आलेल्या सभेत ते बाेलत हाेते.
भर उन्हात थांबलेल्या सर्वांना वंदन करताे, तानाजीराव तुमच्या प्रेमापाेटी हे लाेक आले असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. ही तानाजी सावंत यांच्या विजयाची सभा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तानाजी सावंत यांनी किल्ल्याची राखण हाती घेतली आहे, त्याला खूप दिवस झाले. त्यांचा नाद करायचा नाही. तानाजीराव जादूगार आहेत. ते जादू करतात असेही मुख्यमंत्री म्हणाले. परंडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना उध्दव ठाकरेंनी रणजित पाटील यांना एबी फॉर्म दिला हाेता. मात्र ताे मागे घेत शरद पवार गटाच्या राहुल माेटे यांची उमेदवारी फायनल झाली आहे. यावरुन देखील एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
बाळासाहेबांनी कमावलेल्या धनुष्यबाणाची आण बान शान नियतीने आपल्यावर साेपवली….
बाळासाहेबांनी कमावलेला धनुष्यबाण त्यांनी विकून टाकला असता. आम्ही शिवसेना वाचवल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. बाळासाहेब यांचे विचार विकायला निघाल्यावर आम्ही उठाव करण्याचं धाडस केलं, तानाजीराव माझ्यासाेबत खांद्याला खांदा लावून उभा हाेते. बाळासाहेबांनी कमावलेल्या धनुष्यबाणाची आण बान शान नियतीने आपल्यावर साेपवली आहे. गिनिज बुकमध्ये नाेंद झाली असं काम तुमच्या पठ्ठ्या ने केलंय, असे म्हणत पुन्हा एकदा शिवसेनेच्या बंडात तानाजी सावंत यांची भूमिका महत्त्वाची हाेती, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाविकास आघाडी आणि महायुतीने केलेली काम बघा, हाेऊन जाऊद्या दूध का दूध पाणी का पाणी असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.