ShivsenaNewsUpdate : ढेकणांना आव्हान द्यायचे नसते , अंगठ्याने चिरडायचे असते, उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल
पुणे : “दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या सभेत बोललो की, एक तर तू राहशील किंवा मी राहिल. माझ्या पायाशी कोणीतरी कलिंगड ठेवलेलं होतं. त्यामुळे काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. ढेकणाला कधी आव्हान दिलं जात नाही, ढेकणं अंगठ्याने चिरडायची असतात. कुणीतरी हे आव्हान स्वतःवर घेतलं. त्यानं सांगितलं माझ्या नादाला लागू नका. मी म्हणतो, तुझ्या नादाला लागण्याएवढ्या किंमतीचा तू नाहीच आहेस, मी म्हणजे माझा संस्कारी महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोरांचा पक्ष.”, अशी टीका शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
दरम्यान , माझ्या पक्षात मला मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही. मी हल्ली गद्दारांचा उल्लेख करतच नाही कारण लोकसभा निवडणुकीतच गद्दार मेलेले आहेत. आपण २८८ उमेदवार उभे केले, तर १६० जागा निवडून येतील. पण आपण महाविकास आघाडीत आहोत, यात आपल्याकडेच नेतृत्व राहण्यासाठी आपले जास्तीत जास्त आमदार निवडून आले पाहिजे, असं म्हणत त्यांनी पुणेकरांना विधानसभेसाठी आवाहन केले आहे.
आज पुण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी त्यांनी भाजपावर पुन्हा एकदा टीकास्र सोडले. “बऱ्याच वर्षांनंतर मी पुण्यात येत आहे. यापुढे लढाई मैदानात होणार, हॉलमध्ये होणार नाही”, असेही आव्हान त्यांनी यावेळी दिले.
अहमदशाह अब्दालीचा राजकीय वंशज
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, काही दिवसांपूर्वी पुण्यात भाजपाचा एक कार्यक्रम झाला. इतिहासात आपण डोकावलं, तर शाहिस्तेखान जरा तरी हुशार होता, असं म्हणावं लागेल. त्याचं बोटावर निभावलं. तीन बोटं कापली गेल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात नाही आला. त्यातनं काही शहाणपण यांनी घेतले असते तर परत महाराष्ट्रात आले नसते, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षरित्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली.
“पण ते (अमित शाह) परत का आले? तर महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या फटक्यांचे वळ कुणाकुणाच्या अंगावर उमटले. हे पाहण्यासाठी ते आले. अहमदशाह अब्दालीचा राजकीय वंशज हा पुण्यात आला होता. तो अहमद शाह होता आणि हे अमित शाह आहेत. अहमद शाहचा राजकीय वशंच इथे वळवळायला आला होता. नवाज शरीफचा केक खाणाऱ्यांकडून आता आम्ही हिंदुत्व शिकायचं का? शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचे हे म्हणाले. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे विश्वासघातकी लोक हिंदू असू शकत नाही. तुम्ही आमच्याशी विश्वासघात केला”, असे टीकास्र उद्धव ठाकरेंनी सोडलं.
आम्ही काँग्रेसशी आघाडी केली तर हिंदू विरोधी होतो का?
आम्ही काँग्रेसशी आघाडी केली तर हिंदू विरोधी होतो का? मग तुमचे राजकीय बाप श्यामाप्रसाद मुखर्जी मुस्लीम लीगबरोबर मांडीला मांडी लावून का बसले होते? जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्याबरोबर सरकार स्थापन केले होते. आजही चंद्राबाबू नायडू यांच्याशी आघाडी केली. नायडू हे काय हिंदुत्ववादी आहेत का? नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का? त्यांच्याकडे डोळेझाक करून आमच्यावर टीका करता, असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित करीत भाजपवर घणाघात केला.
राम मंदिर गळतं तसंच नवं संसद भवन देखील गळतं आहे. ज्याने संसद भवन बांधलं तोच पुण्यातील नदी बुजवतोय तीही औरंगजेबच्या राज्यातीलच आहे. आधी १२ महिन्यात संसद भवन गळतंय आणि हिशोब ७० वर्षांचा मागतात. तुमचं सगळंच गळतंय, राम मंदिर, संसद भवन याला गळती सरकारचं म्हणावं लागेल, असं म्हणत त्यांनी मोदींसह विरोधकांवर टीकास्त्र सोडलं.
कोर्टाला आज शेवटची विनंती करतो…
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मशाल ही निशाणी जाणीवपूर्वक निवडली. न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे. ५० वर्षात नक्की निकाल लागेल. आता मी न्याय मागायला जनतेच्या न्यायलयात जातं आहे, आजपासून जनतेच्या न्यायालयात लढाई सुरु झाली आहे. कोर्टाला आज शेवटची विनंती करतो. नाहीतर आता नाद सोडतो. लोकशाही वाचवण्याची जबाबदारी फक्त आमची नाही. न्याय मिळण्यासाठी विलंब होत असेल तर आम्ही जनतेच्या कोर्टात जाऊ. हा लढा उद्धव ठाकरेंचा नाही हा लढा छत्रपतींच्या महाराष्ट्राचा आहे.
तुम्ही मत विकत घेत आहात…
लाडकी बहिण योजना देऊन तुम्ही मत विकत घेत आहात? असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला. महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे. भिकेवर जगणारा नाही. १५०० रुपयात घर चालवणार आहात का? हक्काचं मागितल तर ईडी आणि सीबीआय मागे लावतात. हेच मोदी शाह यांचे धोरण आहे. हा लढा उद्धव ठाकरे अथवा शिवसेनेचा नाही तर या संपूर्ण महाराष्ट्राचा आहे.